खगोलशास्त्र ऑलिम्पियाड; भारताला ४ सुवर्ण, एक रौप्य; जागतिक स्तरावर शास्त्रज्ञांचा पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 07:48 IST2025-08-22T07:47:59+5:302025-08-22T07:48:18+5:30

कठीण चाचण्यांमधून एकूण ५४ पैकी पाच विद्यार्थ्यांची भारतामधून या स्पर्धेसाठी निवड झाली

Astronomy Olympiad; India wins 4 gold, 1 silver; Scientists' feat at global level | खगोलशास्त्र ऑलिम्पियाड; भारताला ४ सुवर्ण, एक रौप्य; जागतिक स्तरावर शास्त्रज्ञांचा पराक्रम

खगोलशास्त्र ऑलिम्पियाड; भारताला ४ सुवर्ण, एक रौप्य; जागतिक स्तरावर शास्त्रज्ञांचा पराक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई १८ व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या तरुण खगोलशास्त्रज्ञांनी अभूतपूर्व यश मिळवले. आरुष मिश्रा, अक्षत श्रीवास्तव, बानीपब्रत माझी आणि पाणिनी यांनी सुवर्णपदक पटकावले, तर सुमंत गुप्ताला रौप्यपदक मिळाले. ६४ देशांतील ३२० तरुण शास्त्रज्ञ या स्पर्धेत सहभागी झाले होते. अंतिम निकाल गुरुवारी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक सभागृहात जाहीर झाला.

या कार्यक्रमाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. दीपांकर बनर्जी आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव, तसेच होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलगुरू डॉ. अनिल काकोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिज्ञासा, सौहार्द आणि जागतिक प्रगतीच्या भावनेतून विज्ञानाच्या नव्या क्षितिजांचा सातत्याने शोध घ्या, असे आवाहन डॉ. काकोडकर यांनी विद्यार्थ्यांना केले. डॉ. बनर्जी यांनी भारतातील अवकाश विज्ञान नव्या टप्प्यात प्रवेश करीत असल्याचे सांगितले.
गट स्पर्धेत 'शनी गटा' या संघाला विशेष विजेतेपद मिळाले. यात बांगलादेशचा फर्हान साजिद, बोलिव्हियाचा अडेमीर जयमेस रिवेरा, ब्राझीलचा लुका पिर्मता, बल्गेरियाचा स्वेतोस्लाव अराबोव, फ्रान्सची चार्लेन इलोय आणि जॉर्जियाची मरियम बेकौरी यांचा समावेश होता.

ही स्पर्धा नाही, तर हा विज्ञानाचा उत्सव

ही स्पर्धा नाही, हा विज्ञानाचा उत्सव आहे. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र यावे, मानवी बुद्धितमत्तेची, बुद्धीची करामत व उत्सुकता समजून घेऊन मानवी जीवन सुखी होण्यासाठी वाटचाल करावी. विद्यार्थ्यांनी अजून सूर्यमाला, कृष्णविवर याबाबत सखोल शोधकार्य करावे, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड शैक्षणिक समिती अध्यक्ष प्रा. अन्वेष मुजुमदार यांनी व्यक्त केली.

यांचा झाला गौरव

होमी भाभा केंद्र आणि अणुऊर्जा विभागाच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली असून, जगभरातील तरुण खगोलशास्त्रज्ञ येथे एकत्र आले, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडच्या जनरल सेक्रेटरी प्रा. नताशा दर्गोवीच यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड गट स्पर्धेतील विशेष विजेता म्हणून 'शनी गटा'चे फर्हान साजिद (बांगलादेश) अडेमीर जयमेस रिवेरा (बोलिव्हिया), लुका पिमेंता (ब्राझील), स्वेतोस्लाव अराबोव (बल्गेरिया), चार्लेन इलोय (फ्रान्स), मरियम बेकौरी (जॉर्जिया) यांना गौरविले गेले.

कठीण चाचण्यांमधून एकूण ५४ पैकी पाच विद्यार्थ्यांची भारतामधून या स्पर्धेसाठी निवड झाली. २१ ऑगस्ट रोजी एकूण १४५ पदके प्रदान केली यामध्ये ५० सुवर्ण, ४४ रौप्य, ५१ कांस्य पदकांसह २६ विशेष उल्लेखपत्रांचा समावेश होता. या ऑलिंपियाडचे आयोजन होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी संयुक्तपणे केले.

Web Title: Astronomy Olympiad; India wins 4 gold, 1 silver; Scientists' feat at global level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.