AstraZeneca नं लसीच्या पुरवठ्यात उशीर झाल्यामुळे Serum Institute ला पाठवली कायदेशीर नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 14:36 IST2021-04-08T14:31:53+5:302021-04-08T14:36:10+5:30
Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या पुरवठ्यात उशीर झाल्यानं ही नोटीस पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

AstraZeneca नं लसीच्या पुरवठ्यात उशीर झाल्यामुळे Serum Institute ला पाठवली कायदेशीर नोटीस
सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाला युकेतील कंपनी AstraZeneca नं कायदेशीर नोटीस बजावली आहे. कोरोना लसीच्या पुरवठ्यात उशीर झाल्यामुळे AstraZeneca नं आपले भागीदार सीरम इन्स्टीट्यूटला ही नोटीस बजावली. सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी याबाबत माहिती दिली.
"मी कायदेशी नोटीसवर कोणत्याही प्रकारची टिपण्णी करणार नाही. कारण ती गोपनीय आहे. परंतु आम्ही कराराशी निगडीत बाबींवर निर्माण झालेला कायदेशीर वाद चांगल्याप्रकारे सोडवण्याचा आणि त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. आम्ही सर्व बाबींवर विचार करत आहोत," असं पूनावाला म्हणाले. बिझनेस स्टँडर्डनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, या नोटीसमध्ये सीरम भारतात लसींच्या पुरवठ्याला प्राधान्य देत असल्यानं आपलं वचन पूर्ण करू शकत नसल्याचं नमूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
अमेरिकेकडून लसीसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या निर्यातीवर निर्बंध
माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्ट्सनुसार इंग्लंडला देण्यात येणाऱ्या लसीच्या शिपमेंटमध्ये उशीर झाल्यानं ही नोटीस बजावण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. यापूर्वी अदर पूनावाला यांनी इंडिया टुडेशीदेखील संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी देशात कोरोना लसीच्या उत्पादनावर परिणाम झाला असल्याचं म्हटलं. युरोप आणि अमेरिकेनं महत्त्वाच्या असलेल्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर प्रतिबंध घातल्यामुळे ही परिस्थिती उद्भ्वल्याचं त्यांनी सांगितलं. "माझी अशी इच्छा आहे की मी तिकडे जाऊ आणि अमेरिकेत जाऊन महत्त्वाच्या कच्च्या मालावर निर्बंध घातल्याचं म्हणत त्यांचा निषेध करू असं वाटतं. हा कच्चा माल भारत आणि जगातील अन्य ठिकाणी लस उत्पादकांसाठी आवश्यक आहे," असंही पूनावाला म्हणाले होते.