गुवाहाटी : आसाम नागरी सेवेतील एका महिला अधिकाऱ्याने उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा ४०० पट जास्त संपत्ती कमावल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा यांनी मंगळवारी ही माहिती दिली. या अधिकाऱ्याच्या निवासस्थानावरील छाप्यात १.५ कोटीचे दागिने आणि ९२.५० लाख रोख रक्कम जप्त केली आहे.
अधिकारी नुपूर बोरा यांना मुख्यमंत्र्यांच्या विशेष दक्षता कक्षाने अटक केली आहे. त्यांच्या घरांवर छापे टाकून ९२.५० लाख रुपये जप्त केले.
कोण आहेत नुपूर बोरा? : नुपूर बोरा २०१९ मध्ये कार्बी आंगलोंग येथे सहाय्यक आयुक्त म्हणून आसाम नागरी सेवेत रुजू झाल्या. २०२३ मध्ये त्यांची बारपेटात सर्कल ऑफिसर म्हणून बदली झाली. त्यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत व्याख्याता म्हणून काम केले होते.
काय केले?
बोरा यांनी बारपेटा येथे सर्कल ऑफिसर म्हणून तैनात असताना बेकायदेशीर जमीन हस्तांतरण करार मंजूर केल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत होती.
आम्ही गुवाहाटी येथील त्याच्या फ्लॅटची आणि बारपेटा येथील भाड्याच्या घराची झडती घेतली.