“१० वर्षांत रेल्वेने मोठी प्रगती केली, वंदे भारत ट्रेन निर्यातीचे काम सुरू”: अश्विनी वैष्णव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 18:24 IST2024-03-02T18:23:46+5:302024-03-02T18:24:31+5:30
Indian Railway Minister Ashwini Vaishnaw News: गेल्या १० वर्षांत भारतीय रेल्वेने मोठी प्रगती केली असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

“१० वर्षांत रेल्वेने मोठी प्रगती केली, वंदे भारत ट्रेन निर्यातीचे काम सुरू”: अश्विनी वैष्णव
Indian Railway Minister Ashwini Vaishnaw News: गेल्या काही वर्षांत रेल्वेने मोठी कामगिरी केली आहे. वंदे भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन यांना अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळाली. तसेच रेल्वे स्थानकांचा विकास केला जात आहे. मालवाहतुकीवर भर दिला जात आहे. तसेच आगामी काळात रेल्वेकडे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत, ज्यामुळे भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलू शकतो. यातच गेल्या १० वर्षांत भारतीय रेल्वेचे अतिशय चांगली प्रगती केल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, येत्या काही वर्षांत भारत किमान एक हजार नवीन अमृत भारत ट्रेन तयार करेल. तसेच ताशी २५० किमी वेगाने धावणारी ट्रेन बनवण्याचे काम सुरू आहे. रेल्वेने वंदे भारत ट्रेन निर्यातीच्या प्रक्रियेसंदर्भात आधीच काम सुरू केले आहे. जगातील सर्वांत उंच चिनाब पूल, आणि कोलकाता मेट्रोसाठी पाण्यातून बोगदा या अशा गोष्टी रेल्वेने अनेकविध आघाड्यांवर केलेली प्रगती दर्शवते, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वेची मोठी सामाजिक जबाबदारी आहे. भारतीय रेल्वेतून प्रतिवर्षी सुमारे ७०० कोटी प्रवासी प्रवास करतात. तिकीटदरांची रचना अशी आहे की, एका व्यक्तीला घेऊन जाण्याचा खर्च १०० रुपये असेल तर आम्ही ४५ रुपये आकारतो. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही सरासरी ५५ टक्के सूट देतो. अमृत भारत ही जागतिक दर्जाची ट्रेन तयार केली आहे. या ट्रेनने फक्त ४५४ रुपये तिकीट दरांत एक हजार किमीचा प्रवास करता येतो, असे रेल्वेमंत्र्यांनी नमूद केले.
दरम्यान, ०६ मार्च रोजी पंतप्रधान मोदी कोलकाता येथील भारतातील पहिल्या नदीखालून बांधण्यात आलेल्या रेल्वे मेट्रो बोगद्याचे उद्घाटन करतील. कोलकाता येथे मेट्रोचे काम १९७० पासून सुरू झाले असले तरी मोदी सरकारच्या कार्यकाळात गेल्या १० वर्षांत झालेली प्रगती त्यापूर्वीच्या ४० वर्षांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. पंतप्रधान मोदींचा भर पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आहे. त्यामुळे २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनेल, असा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला.