मुस्लिमांचे हितचिंतक काल कुठे होते? तिहेरी तलाकवरून ओवेसींचा विरोधी पक्षांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 18:11 IST2019-07-31T18:09:07+5:302019-07-31T18:11:03+5:30
तिहेरी तलाक विधेयकावरील मतदानावेळी विरोधी पक्षांच्या मतांना लागलेल्या सुरुंगावरून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुस्लिमांचे हितचिंतक काल कुठे होते? तिहेरी तलाकवरून ओवेसींचा विरोधी पक्षांना टोला
नवी दिल्ली - तिहेरी तलाक विधेयक काल राज्यसभेमध्ये पारित झाले. त्यामुळे या संदर्भात कायदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, तिहेरी तलाक विधेयकावरील मतदानावेळी विरोधी पक्षांच्या मतांना लागलेल्या सुरुंगावरून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. मुस्लिमांचे हितचिंतक म्हणवणारे पक्ष काल कुठे होते, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
तिहेरी तलाक विधेयकाबाबत विरोधी पक्षांनी राज्यसभेत घेतलेल्या भूमिकेवर ओवेसी यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ''समाजवादी पार्टी, बसपा आणि इतर मोठमोठे पक्ष स्वत:ला मुस्लिमांचे हितचिंतक म्हणवतात. पण हे पक्ष काल कुठे होते, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. काल मतदानावेळी यांचे खासदार कुठे होते.'' दरम्यान, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवाले या निर्णयाचा विरोध करतील, अशी आशा ओवेसींना आहे.
AIMIM MP, Asaduddin Owaisi on #TripleTalaqBill: It is unconstitutional. I hope the All India Muslim Personal Law Board will challenge it in the Supreme Court. pic.twitter.com/Gg5IGKAGbt
— ANI (@ANI) July 31, 2019
तिहेरी तलाक विधेयकाबाबत राज्यसभेत होणाऱ्या मतदानापूर्वी खासदारांना व्हिप जारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचा दावा काँग्रेसने केला होता. त्यावरून ओवेसी यांनी काँग्रेसला टोला हाणला आहे. ''व्हिप जारी करण्यासाठी नेमका किती वेळ लागतो? तरीही हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र गुलाम नबी आझाद, असं सांगत असतील तर ते धक्कादायक आहे. आता तर फोनवरसुद्धा व्हिप जारी होऊ शकतो.''असे ओवेसी म्हणाले.