'देशात आजही जिवंत आहेत नथुराम गोडसेचे वारसदार; मला गोळी मारू शकतात!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 15:23 IST2019-08-14T15:10:48+5:302019-08-14T15:23:59+5:30
असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणामुळे पाकिस्तानला मदत मिळत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे.

'देशात आजही जिवंत आहेत नथुराम गोडसेचे वारसदार; मला गोळी मारू शकतात!'
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर विरोधी पक्षाचे नेते हल्लाबोल करत आहेत. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावरुन एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी केंद्र सरकारवर टीका केली. एक दिवस मलाही गोळी मारु शकतात. जे नथुराम गोडसेचे वारसदार आहेत, तेच असे करु शकतात, असेही असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.
असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणामुळे पाकिस्तानला मदत मिळत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. यावर बोलताना असदुद्दीन ओवेसी यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली. तसेच, ते म्हणाले, 'एक दिवस मला कोणीही गोळी मारु शकते. मला खात्री आहे की, नथुराम गोडसेचे वारसदार आहेत, तेच असे करु शकतात. आता सुद्धा नथुराम गोडसेचे वारसदार जिवंत आहेत.'
याचबरोबर, मी एक खासदार आहे. मात्र, मला अरुणाचल प्रदेश किंवा लक्षद्विपला जाण्यासाठी परवानगी द्यावी लागते असे सांगत असदुद्दीन ओवेसी यांनी आसाममध्ये मी जमीन खरेदी करु शकतो का? असा सवाल केला. तसेच, सध्या जे जम्मू-काश्मीरसोबत झाले आहे. तसेच, नागालँड, मिझोरम, मणिपूर, आसाम आणि हिमाचल प्रदेशातील लोकांसोबत होऊ शकते, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
काश्मीरमध्ये सध्या अघोषित आणीबाणी आहे. त्याठिकाणी फोन सुरु नाहीत किंवा लोकांना बाहेर जाण्याचे स्वातंत्र्य नाही, असे सांगत असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला. याशिवाय, आपल्या विरोधकांवर टीका करताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, जे मला अँटी नॅशनल म्हणतात, ते स्वत: देश विरोधी आहेत. जर नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणे देशद्रोह नाही आहे तर जम्मू - काश्मीरमधील संचारबंदी लगेच हटविली पाहिजे.