मतदानाआधीच अरविंद केजरीवालांना मोठा धक्का; न्यायालयाच्या आदेशानंतर हरियाणात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 22:38 IST2025-02-04T22:26:22+5:302025-02-04T22:38:59+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीला काही तास उरले असताना अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Arvind Kejriwal troubles increase before voting FIR lodged in Haryana on the issue of poison water | मतदानाआधीच अरविंद केजरीवालांना मोठा धक्का; न्यायालयाच्या आदेशानंतर हरियाणात गुन्हा दाखल

मतदानाआधीच अरविंद केजरीवालांना मोठा धक्का; न्यायालयाच्या आदेशानंतर हरियाणात गुन्हा दाखल

Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्येष्ठ वकील जगमोहन मनचंदा यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. केजरीवाल यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना भडकावल्याचा आणि दोन राज्यातील लोकांमध्ये चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचा आरोप आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. या प्रकरणात, न्यायालयाच्या आदेशानंतर अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाच्या इतर सदस्यांविरुद्ध हरियाणामध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हरियाणातील शाहबाद पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

वकील जगमोहन मनचंदा यांनी केजरीवाल यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप केला. "दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा सरकारने यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळल्याबद्दल केलेले वक्तव्य निराधार आहे. या विधानामुळे हरियाणाच्या कारभारावर जनतेमध्ये शंका तर निर्माण होणारच आहे पण या विधानामुळे सर्वसामान्यांमध्ये घबराट आणि अस्वस्थता वाढण्याचीही शक्यता आहे. यमुना नदी कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धेचे प्रतीक असून केजरीवाल यांच्या वक्तव्याने लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीने केलेल्या अशा निराधार आणि अपमानास्पद वक्तव्यामुळे आंतरराज्य सौहार्द कमकुवत होतेच पण सरकारी संस्थांवरील जनतेचा विश्वासही कमी होतो," असं याचिकाकर्ते जगमोहन मनचंदा म्हणाले.

जगमोहन मनचंदा यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून केजरीवाल यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, असेही मनचंदा म्हणाले.

दरम्यान, २७ जानेवारी रोजी एका प्रचार सभेत अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाकडून दिल्लीला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या निकृष्ट दर्जाचा मुद्दा उपस्थित केला होता. भाजप आपल्या गलिच्छ राजकारणाने दिल्लीतील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवू इच्छित आहे. हरियाणातून पाठवण्यात येणाऱ्या पाण्यात विष मिसळले जात आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं.

Web Title: Arvind Kejriwal troubles increase before voting FIR lodged in Haryana on the issue of poison water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.