गुजरातचं मन जिंकण्यासाठी आलोय! केजरीवालांचा अहमदाबादमध्ये भव्य 'रोड शो', भाजपाला दाखवली ताकद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 19:27 IST2022-04-02T19:26:36+5:302022-04-02T19:27:28+5:30
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये 'रोड शो' केला. केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही या रोड शोमध्ये सहभागी झाले होते.

गुजरातचं मन जिंकण्यासाठी आलोय! केजरीवालांचा अहमदाबादमध्ये भव्य 'रोड शो', भाजपाला दाखवली ताकद
अहमदाबाद
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये 'रोड शो' केला. केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. "मी गुजरातमध्ये भाजप किंवा काँग्रेसला हरवण्यासाठी आलो नाही, तर गुजरातच्या जनतेचं मन जिंकण्यासाठी आलो आहे", असं अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले. निकोल खोडियार माता मंदिर येथून दुपारी ३ वाजता रोड शोला सुरुवात झाली. तर या रोड शोची सांगता बापू नगरमध्ये झाली.
केजरीवाल यांच्या रोड शोमध्ये 'मेरा रंग दे बसंती चोला' या गाणी वाजवली जात होती. यावेळी केजरीवाल समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. "तुम्ही सर्वांनी हातात तिरंगा आणला, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला", असं रोड शो दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले.
"दर तीन महिन्यांनी इथं पेपरफुटीची घटना घडते, हे मला कळलं आहे. हे थांबायला हवं. भाजप इथं शिक्षण विकत आहे. देशाची प्रगती कशी होणार? कमळाची फुलं चिखलात फुलतात आणि झाडूनं चिखल साफ केला जातो, असं ते म्हणाले. आम आदमी पक्षाला अहंकाराचा चिखल साफ करावा लागेल", असं मान म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांनीही यावेळी पंजाबमध्ये मान सरकारच्या कामाचं कौतुक केलं. "आपण देशभक्त असायला हवं. पंजाबमधला करिष्मा घडला आहे, देवाला काहीतरी करायचं आहे. आम्ही लहान लोक आहोत. 10 वर्षांपूर्वीपर्यंत मला कुणी ओळखत नव्हतं. आधी दिल्लीत, नंतर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झालं. दिल्लीत शाळा, रुग्णालयं सुधारली. २४ तास वीज दिली. भगवंत मान यांनी १० दिवसांत पंजाबमधील भ्रष्टाचार संपवला आहे. कोणतीही खासगी शाळा फी वाढवणार नाही असा आदेश दिला आहे. २५ हजार नवीन नोकऱ्या दिल्या जाणार आहेत", असं केजरीवाल म्हणाले.