अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर ३३ कोटी खर्च; 'शिशमहाल'वरून राजकारण तापले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 06:32 IST2025-01-06T06:32:16+5:302025-01-06T06:32:58+5:30
तत्कालीन नियंत्रक, महालेखापरीक्षक यांच्या अहवालातील प्रमुख निष्कर्ष

अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर ३३ कोटी खर्च; 'शिशमहाल'वरून राजकारण तापले!
नवी दिल्ली : केजरीवाल यांच्या शिशमहालवरून सध्या राजकारण तापले आहे. तत्कालीन नियंत्रक आणि महालेखापरीक्षक गिरीश चंद्र मुर्मु यांच्या अहवालातील प्रमुख निष्कर्ष समोर येत आहेत. यात त्यांनी असे म्हटले आहे की, केजरीवाल यांच्या निवासस्थानावर ३३ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
आपने म्हटले आहे की, ही तर भाजपची निवडणुकीपूर्वीची रणनीती आहे. निवासस्थानातील किचनच्या उपकरणांवर ३९ लाख रुपये खर्च करण्यात आले. टीव्ही - २० लाख, जिम उपकरणे १८ लाख, सिल्क कार्पेट १६ लाख, मार्बल स्टोनसाठी २० लाख रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, अंतिम खर्च ६६ लाखांवर झाला. टाइल्सचे बजेट ५.५ लाख होते. पण ते १४ लाख रुपयांवर पोहोचले. प्रत्यक्ष कामाच्या वेळी बिल्टअप क्षेत्र ३६ टक्क्यांनी वाढले. म्हणजे, १३९७ चौरस मीटरवरून १९०५ चौरस मीटर झाले.
यामुळे वाढला खर्च
वाढीव कामांमुळे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ६, फ्लॅग स्टाफ रोड, कार्यालय आणि निवासस्थानाच्या नूतनीकरणाचा खर्च वाढला. प्राथमिक अंदाजानुसार, २०२० मध्ये ८.६२ कोटी रुपयांचे काम देण्यात आले. २०२२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने काम पूर्ण केले तेव्हा एकूण खर्च ३३.६६ कोटी रुपये होता.
कोरोनाकाळात त्यांचे लक्ष शिशमहालवर
- पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिल्लीतील लोक कोरोनाशी झगडत होते तेव्हा ‘आप-दा लोकांचे’ संपूर्ण लक्ष स्वतःचे शिशमहाल बांधण्यावर होते.
- त्यांनी शिशमहालसाठी मोठ्या निधीची तरतूद केली. त्यांना दिल्लीतील लोकांची पर्वा नाही. आज प्रत्येक दिल्लीकर म्हणतोय की, आम्ही ‘आप’ला सहन करणार नाही.