दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईबाबत मोठं विधान केलं आहे. "लॉरेन्स बिश्नोईच्या डोक्यावर कोणाचा हात?, वरून राजकीय इशारा दिला जातो, तो सुपारी देतो आणि पंजाब-दिल्लीत हत्या करून घेतो" असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
आपल्या एका मुलाखतीत अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, "तुम्ही आम्हाला पंजाब दिला. जेव्हा आम्ही पंजाब घेतला तेव्हा तो गुंडांच्या ताब्यात होता. वाईट परिस्थिती होती. मी असं म्हणत नाही की, १०० टक्के सुधारणा झाली आहे, पण आता बरीच सुधारणा झाली आहे. आता जर लॉरेन्स बिश्नोई साबरमती जेलमध्ये बसून सुपारी देत असेल तर त्याच्या डोक्यावर कोणाचा हात आहे?"
मीडिया रिपोर्टचा हवाला देत केजरीवाल यांनी दावा केला की, "अलीकडेच एका प्रकरणाच्या तपासात दिल्ली पोलिसांनी सांगितलं होतं की, साबरमती जेलमधील लॉरेन्स बिश्नोईने आपल्या लोकांना या प्रकरणात काम करण्यास सांगितलं होतं, अमित शाह काय करत आहेत?"
गेल्या महिन्यातही अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील वाढत्या गुन्ह्यांवर केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता.
कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याला सरकारकडून संरक्षण मिळत असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला होता. "लॉरेन्स बिश्नोईसारखे गुन्हेगार उघडपणे त्यांच्या कारवाया का सुरू ठेवू शकतात? त्यांना सरकारकडून समर्थन मिळत नसल्याची शक्यता आहे का?" असं देखील केजरीवालांनी म्हटलं आहे.