"अरविंद केजरीवालांनी 'ती' सर्वात मोठी राजकीय चूक केली", प्रशांत किशोरांचं आपच्या पराभवावर भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 09:35 IST2025-02-10T09:33:37+5:302025-02-10T09:35:46+5:30
Prashant Kishor Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा पराभव झाला. या निकालाबद्दल पूर्वीचे राजकीय रणनीतिकार आणि जन सुराज पार्टीचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाष्य केले.

"अरविंद केजरीवालांनी 'ती' सर्वात मोठी राजकीय चूक केली", प्रशांत किशोरांचं आपच्या पराभवावर भाष्य
Prashant Kishor Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठ्या पराभावाला सामोरं जावं लागलं. भाजपने तब्बल २७ वर्षांनी दिल्ली जिंकली. दिल्ली निकालानंतर आपच्या पराभवाची वेगवेगळी कारणे सांगितली जात आहे. या निकालाबद्दल आता जन सुराज पक्षाचे प्रमुख आणि पूर्वीचे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भूमिका मांडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'इंडिया टुडे' वृत्तवाहिनीशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "अलिकडच्या काही वर्षामध्ये अरविंद केजरीवालांनी बदललेली राजकीय रणनीती, जसे की इंडिया आघाडीमध्ये सामील झाले, पण दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय. हा आम आदमी पक्षाच्या पराभवामागील एक प्रमुख कारण आहे."
केजरीवालांच्या निर्णयांवर बोट ठेवत प्रशांत किशोर म्हणाले, "आम आदमी पक्षाच्या पराभवाचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे गेल्या १० वर्षात त्यांच्या विरोधात तयार झालेली सत्ताविरोधी नाराजी. केजरीवालांची दुसरी चूक म्हणजे त्यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा."
"खरंतर अरविंद केजरीवाल यांनी तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता, जेव्हा त्यांना मद्य धोरण प्रकरणात अटक केली गेली होती. पण, केजरीवालांनी जामीन मिळाल्यानंतर आणि निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देऊन दुसऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री केलं. केजरीवालांची ही मोठी राजकीय चूक होती. त्याचा आपला जास्त फटका बसला", असे भाष्य प्रशांत किशोर यांनी केले.
'केजरीवालांच्या प्रतिमेला तडा गेला'
प्रशांत किशोर म्हणाले, "राजकीय भूमिका बदलल्याने केजरीवालांच्या विश्वासार्हतेला तडा गेला. ते आधी इंडिया आघाडीत सामील झाले आणि नंतर दिल्लीत एकटे लढले. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला. अलिकडेच्या काळात त्याचे प्रशासकीय मॉडेलही कमकुवत झाले होते", असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
२७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपचं सरकार
दिल्लीमध्ये भाजपने २७ वर्षानंतर प्रचंड बहुमत मिळवलं आहे. ७० सदस्य संख्या असलेल्या दिल्ली विधानसभेत भाजप ४८ जागांवर जिंकल्या आहेत. आम आदमी पक्षाला २२ जागापर्यंत मजल मारता आली. तर काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा शून्य जागा मिळाल्या आहेत.