अरविंद केजरीवालांच्या अडचणी वाढणार?,'शीशमहाल'ची सखोल चौकशी होणार, सीव्हीसीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:02 IST2025-02-15T12:01:50+5:302025-02-15T12:02:48+5:30
केंद्रीय दक्षता आयोगाने (CVC) अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

अरविंद केजरीवालांच्या अडचणी वाढणार?,'शीशमहाल'ची सखोल चौकशी होणार, सीव्हीसीचे आदेश
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना 'शीशमहाल' म्हणून उल्लेख होत असलेला बंगला त्यांचे अधिकृत शासकीय निवासस्थान होते. या बंगल्यावरून आता नवा वाद उफाळून आला आहे.
केंद्रीय दक्षता आयोगाने (CVC) अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सीव्हीसीच्या म्हणण्यानुसार, अरविंद केजरीवाल यांनी सर्व नियमांचे उल्लंघन करून आठ एकरमध्ये ४०,००० चौरस यार्ड जमिनीवर बंगला बांधला. आता सीपीडब्ल्यूडी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करणार आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी अद्याप अरविंद केजरीवाल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, गेल्या वर्षीच भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी सीव्हीसीला पत्र लिहून या बंगल्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. बंगल्याच्या नूतनीकरण आणि बांधकामात सर्व नियमांचे उल्लंघन झाल्याचे विजेंद्र गुप्ता यांनी म्हटले होते. तसेच, भाजपने निवडणूक काळात बंगल्याची पुनर्बांधणी करताना अरविंद केजरीवाल यांनी आसपासच्या सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोपही केला होता. तसेच, अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर हा बंगला रिकामी केला. त्यानंतर PWD ने बंगल्याच्या सामानांची यादी प्रसिद्ध केली. ती यादी माध्यमांसह सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.