अरविंद केजरीवाल यांची पुन्हा AAP चे राष्ट्रीय संयोजक म्हणून नियुक्ती, कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 13:16 IST2021-09-12T13:16:12+5:302021-09-12T13:16:46+5:30
arvind kejriwal : अरविंद केजरीवाल यांची सलग तिसऱ्यांदा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक म्हणून वर्णी लागली आहे.

अरविंद केजरीवाल यांची पुन्हा AAP चे राष्ट्रीय संयोजक म्हणून नियुक्ती, कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे (AAP) संयोजन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक झाली, ज्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यानंतर, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांची राष्ट्रीय संयोजक आणि पंकज गुप्ता यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली. तर राज्यसभा खासदार एन डी गुप्ता यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली. या तीन पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असणार आहे.
अरविंद केजरीवाल यांची सलग तिसऱ्यांदा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक म्हणून वर्णी लागली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, पक्षाच्या घटनेत सुधारणा करून अनेक बदल करण्यात आले. पक्षाच्या घटनेत आधी म्हटले होते की, कोणताही सदस्य पदाधिकाऱ्यासारखा पदावर सलग दोन वर्षांपेक्षा अधिक काळ तीन वर्षांच्या पदावर राहू शकत नाही.
दरम्यान, पुढील वर्षी अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, ज्या आम आदमी पक्षासाठी खूप महत्वाच्या आहेत. आम आदमी पक्ष पंजाबमधील मुख्य विरोधी पक्ष आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून विजयाचा दावा केला जात आहे. या व्यतिरिक्त, आदमी पक्ष उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देखील घोषित करण्यात आला आहे.
याशिवाय, पुढील वर्षी गोवा आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत, याठिकाणी आम आदमी पक्षाला मोठ्या आशा आहेत. सुरतच्या स्थानिक निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक बड्या व्यक्तींनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.