नवी दिल्ली : अरुण जेटली हे ‘सुपरमॅन’ आहेत, असे समजून वित्त मंत्रालयासह चार मोठ्या खात्यांचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. परंतु कामाच्या प्रचंड बोजामुळे जेटली वित्त मंत्रालयास न्याय देऊ न शकल्याने त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, अशी सडेतोड टीका ज्येष्ठ भाजपानेते यशवंत सिन्हा यांनी केली आहे.माजी केंद्रीय वित्तमंत्री राहिलेले सिन्हा पंतप्रधान मोदींच्या राजवटीत अडगळीत गेले आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’ या दैनिकात, ‘आता मला बोलायलाच हवे,’ या शीर्षकाने लेख लिहून सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती व ही अवस्था का आली, यावर परखड भाष्य केले आहे.जेटली यांनी वित्तमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली, तेव्हा परिस्थिती खूपच अनुकूल होती. पण त्यांना हे काम झेपले नाही. वित्त मंत्रालयाचे काम मंत्र्याला अहोरात्र काम करूनही उरकणार नाही, एवढे असते. यासाठी पूर्णवेळ व लक्ष देण्याची गरज असते. पण एकाच वेळी चार मंत्रालयांचे काम सांभाळणारे जेटली ते करू शकले नाहीत. लोकसभा निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसणे अपरिहार्य असल्याचे भाकित करून सिन्हा म्हणतात, की अर्थव्यवस्था उभारण्यापेक्षा ती खिळखिळी करणे सोपे असते. निवडणूक प्रचारात थापा पचतात. पण एका रात्रीत अर्थव्यवस्थेला उभारी येईल, अशी जादुची कांडी कोणाकडेही नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत अर्थव्यवस्था बाळसे धरू शकत नाही. अत्यंत कडवट भाषेत समारोप करताना सिन्हा लिहितात, की आपण गरिबी फार जवळून पाहिली, असे पंतप्रधान सांगतात. त्यांच्याप्रमाणेच सर्व भारतीयांनाही गरिबीचे चटके बसावेत, यासाठी त्यांचे वित्तमंत्री (जेटली) जिवाचे रान करीत आहेत!पंतप्रधानांचे पाच पांडवसिन्हा लिहितात, की पंतप्रधान चिंतेत आहेत. पंतप्रधान वित्त मंत्रालयासोबत बैठक घेणार होते, पण कधी ते माहीत नाही. वित्तमंत्री नव्या ‘पॅकेज’ची भाषा करीत आहेत. लोक श्वास रोखून त्याची प्रतीक्षा करीत आहेत. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची फेररचना केली जाणे, एवढेच काय ते नवीन आहे. आता या सल्लागार परिषदेने पांडवांप्रमाणे महाभारताचे नवे युद्ध आपल्याला जिंकून द्यावे, अशी अपेक्षा केली जात आहे.भीतीपोटी गप्पआता मी जाहीरपणे बोललो नाही तर देशाविषयीच्या कर्तव्यात कसूर केल्यासारखे होईल, या भावनेने मी हे लिहित आहे. या लेखात मी जे म्हणणे मांडत आहे तशाच भावना भाजपा आणि त्याबाहेरच्याही अनेक लोकांच्या मनात आहेत, पण हे लोक भीतीपोटी बोलत नाहीत, अशी माझी खात्री झाली आहे, असे सिन्हा यांनी लिहिले आहे.
अरुण जेटलींनी अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली! यशवंत सिन्हा यांची सडकून टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 06:01 IST