कर्नाटकात अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करणा-या भावाला अटक
By Admin | Updated: February 11, 2016 18:14 IST2016-02-11T18:04:20+5:302016-02-11T18:14:07+5:30
कर्नाटकच्या नेजारमध्ये बहिण-भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे.

कर्नाटकात अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करणा-या भावाला अटक
ऑनलाइन लोकमत
नेजार, दि. ११ - कर्नाटकच्या नेजारमध्ये बहिण-भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या दाक्षिणा कन्नड जिल्ह्यात नेजारमध्ये सख्ख्या भावाने अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कर्नाटक पोलिसांनी सख्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करणा-या नराधम भावाला अटक केली आहे. श्रीधर असे आरोपीचे नाव आहे. डीएनए चाचणीतून बलात्कार केल्याचे सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी श्रीधरला (२२) अटक केली.
पिडित मुलगी १४ वर्षांची आहे. जून ते ऑगस्ट २०१५ दरम्यान श्रीधर दारु पिऊन आल्यानंतर त्याने प्रत्येकवेळी आपल्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केला. पिडीत मुलीचे आई-वडिल दैनंदिन रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. त्याना श्रीधरच्या गुन्ह्याची पूर्ण माहिती होती. तरीही ते मूक बनून राहिले.
जेव्हा मुलगी गर्भवती राहिल्याचे समजले तेव्हा त्यांनी मुलीचा गर्भपात केला. स्थानिक रुग्णालयाने ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विचार करुन मुलगी आरोपीचे नाव सांगण्यास धजावत नव्हती. बाहेरची व्यक्ती यामध्ये सहभागी नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी घरातील पुरुषांची चौकशी सुरु केली. त्यांची डीएनए टेस्ट केली. स्थानिक न्यायालयाने श्रीधरला २७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.