'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 11:28 IST2025-12-14T11:27:40+5:302025-12-14T11:28:31+5:30
Messi Event Chaos Kolkata: मेस्सी इव्हेंटमधील गोंधळानंतर राजकारण तापले! आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची ममता बॅनर्जींना अटक करण्याची मागणी. बंगालमधील 'व्हीआयपी संस्कृती'वर टीका.

'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
फुटबॉल जगतातील महान खेळाडू लिओनेल मेस्सीच्या कोलकाता दौऱ्यात सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. या गोंधळाची जबाबदारी घेत राज्याच्या गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाच अटक करावी, अशी थेट मागणी आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी केली आहे.
शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सरमा यांनी पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर तीव्र टीका केली. "कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात झालेला गोंधळ हे दर्शवतो की, राज्यात कायद्याचे राज्य पूर्णपणे कोलमडले आहे," असे सरमा म्हणाले.
'गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना अटक करा' मेस्सीला पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी हजारो रुपये खर्च करून तिकीट खरेदी केले होते, मात्र व्हीआयपी संस्कृतीमुळे मेस्सी मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गराड्यातच राहिला. त्यामुळे प्रेक्षकांना त्याची साधी झलकही पाहता आली नाही. यावर संताप व्यक्त करत सरमा म्हणाले, "राज्याच्या गृहमंत्री आणि कोलकाता पोलीस आयुक्तांना या अपयशासाठी सर्वप्रथम अटक करायला हवी."
मेस्सीसारखा जागतिक आयकॉन कोलकातामध्ये असताना, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अशा प्रकारे अराजकता निर्माण होणे हे बंगालसाठी अत्यंत लज्जास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. इतर राज्यांमध्ये मोठ्या कार्यक्रमांचे झालेले यशस्वी व्यवस्थापन आणि बंगालमधील गोंधळ यांची तुलना करून, सरमा यांनी ममता बॅनर्जी यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
मेस्सीच्या पहिल्या वहिल्या भारत दौऱ्यातील कोलकाता लेगमध्ये, सॉल्ट लेक स्टेडियममध्ये तो अवघ्या काही मिनिटांसाठी उपस्थित होता. परंतु, व्हीआयपी लोकांनी त्याला पूर्णपणे वेढल्यामुळे चाहत्यांना त्याला पाहताच आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने स्टेडियममध्ये तोडफोड आणि गोंधळ घातला. या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांनी चाहत्यांची माफी मागत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत आणि मुख्य आयोजकाला अटकही करण्यात आली आहे.