आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज - मनोज नरवणे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 12:10 PM2020-01-01T12:10:48+5:302020-01-01T12:20:45+5:30

'देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहू. आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज आहे.'

Army chief Gen Manoj Mukund Naravane: We will pay special attention to respecting human rights | आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज - मनोज नरवणे

आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज - मनोज नरवणे

Next

नवी दिल्ली - जनरल बिपीन रावत यांच्या निवृत्तीनंतर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नरवणे यांनी नॅशनल वॉर मेमोरिअलला भेट दिली. देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहू. आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज आहे. देशाच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. तसेच मानवाधिकारांच्या रक्षणासाठी विशेष काम करणार असल्याचं मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटलं आहे.

'माझी जबाबदारी अधिक योग्यरित्या पेलता यावी यासाठी शक्ती आणि साहस देण्याची मी देवाकडे प्रार्थना करत आहे. लष्कर, नौदल आणि हवाईदल देशाच्या सुरक्षेसाठी तयार आहेत. आम्ही मानवाधिकारांच्या रक्षणासाठी विशेष काम करणार आहोत. देशाच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. देशाच्या सीमा जेव्हा सुरक्षित असतील तेव्हाच देश प्रगती करेल' असं नरवणे यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

'आम्ही आमची क्षमता अधिक वाढवणार आहोत. जवान हे देश सुरक्षित ठेवतील. लष्करी कारवाईसाठी सदैव तत्पर राहणं हे आमचं प्राधान्य असेल' असं देखील नरवणे यांनी म्हटलं आहे. शेजारच्या देशाने दहशतवादाला खतपाणी देणे थांबवले नाही, तर दहशतवादाचा उगम जेथून होतो तेथे हल्ला करण्याचा हक्क भारताने राखून ठेवला आहे, अशा कठोर शब्दांत  लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पाकिस्तानला मंगळवारी (31 डिसेंबर) इशारा दिला होता. 

वृत्त संस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत जनरल नरवणे म्हणाले की, सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला त्याची जागा दाखवणारी खंबीर व्यूहरचना विकसित केली गेलेली आहे. सरकारचाच पाठिंबा असलेल्या दहशतवादावरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने केलेले सगळे प्रयत्न पूर्णपणे फसले असून, कलम ३७० रद्द झाल्यापासून काश्मीरमधील परिस्थितीत लक्षणीयरित्या सुधारणा झाली आहे, असे नरवणे म्हणाले.

सप्टेंबर 2018 मध्ये मनोज नरवणेंकडे पूर्व मुख्यालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. लष्कराच्या दृष्टीनं पूर्व मुख्यालयाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. चीनला लागून असलेल्या जवळपास 4 हजार किलोमीटर सीमेचं संरक्षण करण्याची जबाबदारी पूर्व मुख्यालयाकडे असते. त्यामुळे या पदाची धुरा खांद्यावर घेतल्यापासूनच नरवणेंचं नाव लष्करप्रमुख पदाच्या शर्यतीत होतं.

आपल्या 37 वर्षांच्या सेवाकाळात मनोज नरवणेंनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. जवळपास सर्वच परिस्थितींमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. जम्मू-काश्मीर आणि ईशान्येच्या राज्यांमधील आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स बटालियनचं यशस्वी नेतृत्त्व त्यांनी केलं आहे. श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या पथकातही त्यांनी उल्लेखनीय काम केलं. याशिवाय म्यानमारमधील दूतावासातही त्यांनी तीन वर्ष महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. 

नरवणे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण 'ज्ञानप्रबोधिनी'त झालं आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते जून 1980 '7 सीख लाइट इन्फंट्री'मधून लष्करात रूजू झाले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे 'इन्स्पेक्टर जनरल', स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील 'जनरल ऑफिसर इन कमांडिंग', लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू स्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांवर काम करताना त्यांनी ठसा उमटवला.
 

Web Title: Army chief Gen Manoj Mukund Naravane: We will pay special attention to respecting human rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.