Tufail spying for pakistan : उत्तर प्रदेशएटीएसने वाराणसीमधून एका व्यक्तीला अटक केली आहे. पाकिस्तान पुरस्कृत भारतविरोधी संघटनांच्या तो संपर्कात होता. या संघटनांना त्याने भारतातील काही ठिकाणांची माहिती दिली. इतकेच नाही, बंदी असलेल्या तहरीक ए लब्बॅकचा म्होरक्या मौलाना शाद रिझवी याचे व्हिडीओ तो भारतातील व्हॉट्सअपवर शेअर करत होता. तो तब्बल ६०० पेक्षा जास्त पाकिस्तानी मोबाईलच्या संपर्कात होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उत्तर प्रदेशएटीएसने या बद्दलची माहिती दिली आहे. वाराणसी जिल्ह्यातील दोशीपुरा येथील तुफैल मकसूद आलम असे आरोपीचे नाव आहे. राष्ट्राच्या अखंडतेला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशा पद्धतीची माहिती पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांना पुरवल्याचा आरोप तुफैलवर आहे.
तुफैलने भारतात राहुन काय काय केलं?
एटीएसने निवेदन जारी करून सांगितले की, तपासातून या गोष्टी समोर आल्या की तुफैल पाकिस्तानातील अनेक व्यक्तीच्या संपर्कात होता. बंदी घालण्यात आलेल्या पाकिस्तानातील तहरीक ए लब्बॅक या संघटनेचा म्होरक्या मौलाना शाद रिझवी याचे भारतविरोधी व्हिडीओ व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायचा.
बाबरी मशिदीचा बदला घेण्यासंदर्भातील आणि भारतात शरीया कायदा लागू करण्यासंबंधीचे, त्याचबरोबर गजवा ए हिंद करण्याचे मेसेज वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करत होता.
तुफैलने पाकिस्तानला भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती दिली?
उत्तर प्रदेश एटीएसने सांगितले की, तुफैलने भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती आणि फोटो पाकिस्तानातील व्यक्तींच्या नंबरवर पाठवली. यात राजघाट, नमोघाट, ज्ञानव्यापी, रेल्वे स्टेशन, जामा मशीद, लाल किल्ला, निजामुद्दीन औलिया या ठिकाणांचा समावेश आहे. तुफैलने पाकिस्तानातून चालवल्या जाणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक वाराणसी आणि इतर ठिकाणच्या लोकांनाही पाठवत होता. तुफैल ६०० पेक्षा अधिक पाकिस्तानी क्रमांकावर संपर्क करत होता.
पाकिस्तानी महिलेच्याही संपर्कात
एटीएसने सांगितले की, तुफैल फेसबुकच्या माध्यमातून एका पाकिस्तान महिलेच्याही संपर्कात होता. या महिलेचा पती पाकिस्तानच्या लष्करात कार्यरत आहे. एटीएसने तुफैलविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल आणि सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.