काश्मीरमध्ये आणखी दाेन जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 03:58 IST2020-11-28T03:57:49+5:302020-11-28T03:58:28+5:30
नियंत्रण रेषेजवळ पाकचा गाेळीबार, भारताचे जोरदार प्रत्युत्तर

काश्मीरमध्ये आणखी दाेन जवान शहीद
जम्मू : पाकिस्तानी सैन्याच्या काश्मीरमध्ये कुरापती सुरूच आहे. राजाैरी जिल्ह्यात सुंदरबनी सेक्टरजवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गाेळीबारात भारताच्या आणखी दाेन जवानांना वीरमण आले.
लष्काराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने गाेळीबार केला. तसेच माेर्टारचाही मारा करण्यात आला. त्यात नायक प्रेमबहादूर खत्री आणि रायफलमन सुखबीर सिंग हे गंभीर जखमी झाले हाेते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्याेत मालवली. भारताने या गाेळीबाराचे जाेरदार प्रत्युत्तरही दिले. त्यात पाकिस्तानी सैन्याचेही माेठे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने नियंत्रण रेषेवर गाेळीबार सुरूच आहे. गुरुवारी पूंछ भागात झालेल्या गाेळीबारात उत्तराखंड येथील सुभेदार स्वतंत्र सिंह हे शहीद झाले. तर दहशवाद्यांनी खुशीपूर भागात केलेल्या हल्ल्यात जळगावच्या यश देशमुख यांच्यासह २ जवान शहीद झाले. ऐन दिवाळीमध्ये पाकिस्तानी सैन्याने उत्तर काश्मीर भागात नियंत्रण रेषेवर गाेळीबार केला हाेता. त्यात पाच जवान शहीद झाले हाेते. पाकिस्तानकडून यावर्षी सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढत आहे.