नक्षल्यांची वार्षिक वसुली १०० कोटींची
By Admin | Updated: June 23, 2014 04:35 IST2014-06-23T04:35:55+5:302014-06-23T04:35:55+5:30
देशात नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव छत्तीसगड राज्यात आहे. माओवाद्यांना येथून मिळणारा भरमसाठ पैसा हे त्यामागील मुख्य कारण आहे.

नक्षल्यांची वार्षिक वसुली १०० कोटींची
रायपूर : देशात नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव छत्तीसगड राज्यात आहे. माओवाद्यांना येथून मिळणारा भरमसाठ पैसा हे त्यामागील मुख्य कारण आहे. विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माओवादी राज्यातून दरवर्षी सुमारे ८० ते १०० कोटी रुपये गोळा करतात.
नक्षलग्रस्त राजनांदगाव जिल्ह्यातील सीतागाव आणि औंधीच्या जंगलात यावर्षी ४ मार्चला सुरक्षा दलांनी नक्षल्यांनी तयार केलेली एक भूमिगत तिजोरी जप्त केली. यात २९ लाख रुपये होते. पोलिसांकडून नक्षल्यांची एवढी रक्कम पकडण्याची ही पहिलीच घटना होती. नक्षलग्रस्त भागात अशा शेकडो भूमिगत तिजोऱ्या असून, यात नक्षली आपला पैसा लपवून ठेवत असतात. जमीन खोदून एक खड्डा तयार केला जातो व त्यात ही तिजोरी ठेवली जाते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, देशातील बडे नक्षली नेता या राज्यावर लक्ष ठेवून आहेत; कारण त्यांना येथून फार मोठी रक्कम मिळत असते. ही रक्कम वर्षाला ८० ते १०० कोटींपर्यंत जात असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना विविध माध्यमांकडून मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता गुडसा उसेंडी ऊर्फ जीवीके प्रसाद यानेसुद्धा याला दुजोरा दिला आहे.
नक्षली त्यांचा दबाव असलेल्या क्षेत्रातील सामान्य लोकांकडून तीन कोटी, व्यापाऱ्यांकडून १० कोटी, ठेकेदार २० कोटी, ट्रान्स्पोर्टर्स १० कोटी, तेंदूपत्ता ठेकेदार २० कोटी, बांबू आणि जंगल तोडणाऱ्यांकडून १५ कोटी, उद्योगपतींकडून २० कोटी तर या भागात कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून देणगीच्या रूपात जवळपास दोन कोटी रुपये वर्षाला वसूल करतात. नक्षल्यांकडून ही वसुली अत्यंत सावधपणे होत असते. तसेच ही रक्कम ठेवण्याची गुप्त ठिकाणेही प्रत्येक भागात फक्त दोघांना माहिती असतात. या पैशाचे नियोजनही फार काळजीपूर्वक केले जाते. (वृत्तसंस्था)