घोषणा सव्वालाखाची, प्रत्यक्षात अर्ध्याही तपासण्या नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 05:46 IST2020-11-25T05:46:20+5:302020-11-25T05:46:47+5:30
नवी दिल्लीतील चित्र : केजरीवालांचे ब्रीद ‘अधिकाधिक तपासण्या, सर्वोत्तम उपचार’

घोषणा सव्वालाखाची, प्रत्यक्षात अर्ध्याही तपासण्या नाहीत
विकास झाडे
नवी दिल्ली : दिल्लीत सलग चौथ्या दिवशी शंभरावर रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. आठवडाभरापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केजरीवालांसोबत घेतलेल्या बैठकीत १ लाखावर तपासण्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या; परंतु पायाभूत सुविधा नसल्याने तपासण्या ५० हजारांच्या घरातच होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘अधिकाधिक तपासण्या, सर्वोत्तम उपचार’ अशी घोषणा केली; परंतु गेल्या दोन आठवड्यांत केजरीवाल यांनी प्रत्यक्ष काम कमी आणि घोषणाबाजीवरच अधिक भर दिल्याचे दिसून येते. गेल्या दहा दिवसांवरील तपासण्यांवर नजर टाकली तर केवळ तीन दिवस ६२ हजार तपासण्या झाल्या. दोन दिवस ५५ हजार अन्य दिवसात केवळ ४० हजारांच्या घरात तपासण्या झाल्या आहेत. सोमवारी सर्वांत कमी ३७ हजार तपासण्या करण्यात आल्या. सोमवारी दिल्लीतील १२१ रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला.
आरटीपीसीआरचा संकल्प मात्र...
दिल्लीत आतापर्यंत अॅन्टिजन तपासणीवर अधिक भर होता; परंतु या तपासणीचे अहवाल शंभर टक्के बरोबर असतीलच याबाबत विवाद आहेत. आरटीपीसीआर तपासणी केवळ २० ते ३० टक्के होत होती.
दिल्लीत या तपासण्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक नेण्याचा संकल्पही अमित शहा यांच्या बैठकीत करण्यात आला होता. बैठक संपताच संकल्पही केराच्या टोपलीत गेला आहे.