गाय राष्ट्रमाता घोषित करा; आदित्यनाथ यांची मागणी
By Admin | Updated: April 3, 2015 22:57 IST2015-04-03T22:57:59+5:302015-04-03T22:57:59+5:30
गाय ही राष्ट्रमाता म्हणून घोषित करण्याची मागणी भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील हिंदू युवा वाहिनीने केली आहे.

गाय राष्ट्रमाता घोषित करा; आदित्यनाथ यांची मागणी
नवी दिल्ली : गाय ही राष्ट्रमाता म्हणून घोषित करण्याची मागणी भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील हिंदू युवा वाहिनीने केली आहे.
भाजपच्या मिस्ड कॉल सदस्यता मोहिमेला मिळालेल्या यशापासून प्रेरणा घेऊन आता हिंदू युवा वाहिनीनेही त्याच मार्गाचा अवलंब करण्याचे ठरविले आहे. गाय राष्ट्रमाता म्हणून घोषित करण्याच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी वाहिनीने अलिगड येथे प्रायोगित स्तरावर ०७५३३००७५११ मिस्ड कॉल नोंदणी मोहीम सुरू केली आहे.
‘गाय ही सनातन धर्माची ओळख आहे. ती हिंदू धर्माचे प्रतीक आहे. भारताची आध्यात्मिकता आणि आर्थिक उत्पत्तीशास्त्र यांचा परस्पर संबंध आहे यात शंकाच नाही. गोवंश आणि गोसंपदा ही भारतातील ऐहिक आणि धार्मिक जग यांच्यातील दुवा आहे’, असे आदित्यनाथ म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत आणि काही राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भारतात काही प्रमाणात गोवंश संरक्षण व संवर्धनाच्या मोहिमेला बळकटी मिळाली आहे. महाराष्ट्रातील युती सरकारने तसेच हरियाणातील भाजप सरकारने तर गोहत्या बंदी कायदाही केलेला आहे, हे येथे उल्लेखनीय. (लोकमत न्यूज नेटवर्क)