अंकिता भंडारी या तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून सध्या उत्तराखंडमध्ये मोठं वादळ निर्माण झालेलं आहे. तसेच या प्रकरणावरून अनेक आरोप प्रत्यारोपही होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्याची घोषणा केली आहे. मृत अंकिता भंडारी हिच्या आई-वडिलांनी केलेली विनंती विचारात घेऊन मुख्यमंत्री धामी यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणाच्या निष्पक्ष आणि पारदर्शक तपासासाठी सरकार सुरुवातीपासूनच काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
या बाबत अधिक माहिती देताना पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, ‘या प्रकरणी तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. तसेच आरोपींनाही अटक करण्यात आली असून, कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अंकिता ही आमच्यासाठी बहीण-मुलीसारखी होती. तसेच सरकार तिला पूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे’.
दरम्यान, उत्तराखंड सरकारने घेतलेल्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. त्यांनी सांगितलं की, उत्तराखंड सरकारने घेतलेला हा निर्णय काँग्रेस आणि इतरांनी केलेल्या संघर्षाला मिळालेलं यश आहे. आता सीबीआयचा हा तपास उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली होतो की नाही हे पाहावं लागेल, असेही ते म्हणाले.