उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे कौटुंबिक वादातून पती पत्नीने जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. पतीने पत्नीला नातेवाईकाच्या लग्नामध्ये न नेल्याने नाराज झालेल्या पत्नी संतापाच्या भरात जीवन संपवलं. त्यानंतर पत्नीचा मृत्यू झाल्याने दु:खी झालेल्या पतीने भरधाव ट्रेनसमोर उडी मारून आपल्याची जीवनाचा शेवट केला. मात्र पती पत्नीने अगदी किरकोळ वादातून उचलेल्या या टोकाच्या पावलामुळे त्यांची दोन मुलं अनाथ झाली आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार चांदपूर क्षेत्रातील ककराला गावातील रोहित कुमार याच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं. संपूर्ण कुटुंब लग्नाला गेलं होतं. तसेच रोहितची पत्नीही लग्नाला जाण्याची तयारी करत होती. मात्र रोहित मद्यपान करून घरी आला तेव्हा त्याने लग्नाला जाण्यास नकार दिला. त्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. तसेच रोहित रागाच्या भरात घरापासून दूर निघून गेला. तो गेल्यानंतर नाराज झालेल्या पत्नी पार्वतीने घरातच गळफास घेऊन जीवन संपवलं.
काही वेळाने रोहित घरी आला. तेव्हा त्याने पत्नीला गळफास घेतलेल्या स्थितीत पाहिलं. त्याने आरडाओरडा केला. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना गोळा होत पार्वतीला खाली उतरवले आणि रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी पार्वतीला मृत घोषित केले. पत्नीचा मृत्यू झाल्याने धक्का बसलेला रोहितही नंतर घराबाहेर पडला आणि दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे मार्गावर पोहोचला. तिथे त्याने दिल्लीहून येत असलेल्या दिल्ली-कोटद्वार सिद्धबली एक्स्प्रेससमोर उडी घेत जीवन संपवलं.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, पती-पत्नीने अगदी किरकोळ कारणातून जीवन संपवल्याने दोन मुलं अनाथ झाली आहेत. त्यामध्ये ३ वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.