Goa Crime : गोव्यात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बीचवरील रेस्टॉरंट मालक आणि पर्यटकांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली. या वादात आंध्र प्रदेशातील एका पर्यटकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना २९ डिसेंबरच्या पहाटे उत्तर गोवा जिल्ह्यातील कळंगुट येथील बीचवर घडली.
आंध्र प्रदेशातील ताडेपल्लीगुडेम येथे राहणारा ३० वर्षीय रवी तेजा आपल्या ८ मित्रांसह गोव्याला गेला होता. ज्यामध्ये काही मुलींचाही समावेश होता. गोव्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पर्यटकांचा हा गट दारूच्या नशेत होता. त्यांनी समुद्रकिनारी एका रेस्टॉरंटमध्ये जेवण मागवले. जेवण झाल्यानंतर पर्यटकांचा तिथल्या मालकासोबत काही मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी एका पर्यटकाने रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या महिलेविरुद्ध अपशब्द वापरण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
यानंतर तिथे काम करणाऱ्या व्यक्तीने रवी तेजाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने हल्ला केला. त्यामुळे रवी तेजाचा मृत्यू झाला. गोवापोलिसांनी या घटनेबाबत तिथे काम करणाऱ्या २३ वर्षीय कमल सोनार याला अटक केली असून तो नेपाळचा रहिवासी आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बिलावरून रेस्टॉरंट मालकाशी वाद झाल्याचा आरोप रवी तेजाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या वादानंतर सुमारे १४ जणांनी रवी तेजा याच्या ग्रुपवर हल्ला केला. रवी तेजा यांच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी करत गोवा सरकारने तातडीने कारवाई करावी असे म्हटलं आहे. रवी तेजाचा मृतदेह ताडेपल्लीगुडेम येथे पोहोचल्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्यावर अंतिम संस्कार केले.
दुसरीकडे इंडिया टुडेच्या वृत्तानुसार रेस्टॉरंट मालकाच्या मुलाने रवी तेजाच्या ग्रुपमधील एका मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर हा वाद सुरू झाला. रेस्टॉरंटचे कर्मचारी आणि मालकाच्या मुलाने गटावर हल्ला केल्याने हा वाद हिंसाचारात वाढला. या हल्ल्यात रवी तेजा गंभीर जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, ताडेपल्लीगुडेमचे आमदार बोलिसेट्टी श्रीनिवास यांनी मध्यस्थी करून रवी तेजाचा मृतदेह त्याच्या गावी परत आणला. गोव्याची अधिकाऱ्यांशी समन्वय साधून, त्यांनी विशेष विमानाने रवी तेजाचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवला. या घटनेमुळे गोव्यातील नवीन वर्षाच्या उत्सवावर पडसाद उमटले असून, पर्यटकांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे.