...अन् ‘उमराव जान’ संसदेत
By Admin | Updated: August 13, 2014 02:38 IST2014-08-13T02:38:26+5:302014-08-13T02:38:26+5:30
संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रथमच राज्यसभेत हजेरी लावली. यादरम्यान राजकारणात जम बसवू पाहणारी अभिनेत्री राखी सावंत सभागृहाच्या प्रेक्षक दीर्घेत बसलेली दिसली.

...अन् ‘उमराव जान’ संसदेत
नवी दिल्ली : सन २०१२ मध्ये राज्यसभेवर नामनियुक्त सदस्य म्हणून वर्णी लागल्यानंतर उण्यापुऱ्या सात दिवस सभागृहात हजेरी लावणाऱ्या आणि त्यावरून टीकेचे लक्ष्य ठरलेल्या अभिनेत्री रेखा अर्थात ‘उमराव जान’ अखेर मंगळवारी संसदेत अवतरल्या. संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रथमच राज्यसभेत हजेरी लावली. यादरम्यान राजकारणात जम बसवू पाहणारी अभिनेत्री राखी सावंत सभागृहाच्या प्रेक्षक दीर्घेत बसलेली दिसली.
राखडी रंगाची साडी नेसलेल्या रेखा प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभागृहात आल्या. येताच त्यांनी सभापतींना अभिवादन केले आणि नामनियुक्त सदस्य अनु आगा यांच्या शेजारी जाऊन बसल्या. रेखा सुमारे तासभर सभागृहात हजर राहिल्या. यादरम्यान त्या काहीही बोलल्या नाहीत. क्रिकेटपटू सचिन व अभिनेत्री रेखा यांना २०१२ मध्ये राज्यसभेचे नामनियुक्त सदस्यत्व देण्यात आले होते़ तेव्हापासून सचिन केवळ तीन दिवस तर रेखा सात दिवस सभागृहात हजर राहिल्या. संसदेच्या चालू अधिवेशनात तर हे दोन्ही सदस्य संसदेकडे फिरकले नसल्यामुळे, अनेक पक्षाच्या सदस्यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवत, हा मुद्दा लावून धरला होता. आज अखेर रेखांबाबतची सदस्यांची नाराजी थोड्या प्रमाणात का होईना दूर झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)