...आणि अपहरणकर्ते घाबरले; जाणून घ्या 'रॉटविलर'च्या 100 किलोमीटरच्या प्रवासाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 15:28 IST2018-02-14T15:17:38+5:302018-02-14T15:28:36+5:30
आतापर्यंत आपण माणसाचे अपहरण झाल्याचे ऐकून आहोत पण चक्क एका रॉटविलर कुत्र्याचे अपहरण झाले होते. त्याला शोधण्यासाठी मालकाने चक्क वर्तमानपत्रात जाहीरात देऊन बक्षीसही जाहीर केले होते.

...आणि अपहरणकर्ते घाबरले; जाणून घ्या 'रॉटविलर'च्या 100 किलोमीटरच्या प्रवासाची गोष्ट
बंगळुरु - आतापर्यंत आपण माणसाचे अपहरण झाल्याचे ऐकून आहोत पण दक्षिण बंगळुरुमध्ये चक्क एका रॉटविलर कुत्र्याचे अपहरण झाले होते. त्याला शोधण्यासाठी मालकाने चक्क वर्तमानपत्रात जाहीरात देऊन बक्षीसही जाहीर केले होते. 28 जानेवारीला निवृत्त अधिकारी कृष्णा वाय. बी. यांचा लाडका कुत्रा बबलुचे काही जणांनी अपहरण केले. अपहरणकर्ते रात्रीच्यावेळी कृष्णा यांच्या गिरीनगर फेज टू येथील घरात घुसले व त्यांचा रॉटविलर कुत्रा पळवला. पण आठवडयाभराने हाच कुत्रा मंदिराचे पूजारी उमेश भट यांच्या पाठोपाठ डोडबल्लारपूर पोलीस स्थानकात चालत आल्यामुळे पोलीसही चक्रावून गेले.
कृष्णा वाय. बी. यांनी बबलुला शोधण्यासाठी कर्नाटकातील वर्तमानपत्र आणि केबल चॅनलवर जाहीरात दिली होती. बबलुला शोधून देणा-याला इनामही जाहीर केले होते. उमेश भट यांच्या घराजवळ अपहरणकर्ते या कुत्र्याला सोडून निघून गेले होते. त्यांनी बबलु हरवल्याची जाहीरात टीव्हीवर पाहिली होती. त्यामुळे ते डोडबल्लारपूर पोलीस ठाण्यात या कुत्र्याला घेऊन आले.
पोलिसांनी या प्रकरणी गिरीनगर भागातील रिक्षाचालक रविंद्र याला अटक केली आहे. बबलु जेव्हा मालकासोबत फिरायला यायचा तेव्हा रविंद्र त्याचे लाड करायचा. त्यामुळे मालकाने त्याच्यावर संशय व्यक्त केला होता. चौकशीमध्ये रविंद्रने त्याने बबलुचे अपहरण केल्याची कबुली दिली. रविंद्र आणि त्याच्या मित्राने दुचाकीवरुन बबलुला पळवून डोडबल्लारपूरमध्ये एका मित्राकडे सोपवले.
बबलु हरवल्याची जाहीरात त्या मित्राने टीव्हीवर पाहिल्यानंतर पोलीस अपहरणकर्त्याच्या शोधात असल्याचे त्याला समजले. त्यामुळे घाबरलेल्या त्या मित्राने बबलूला उमेश भट यांच्या घराजवळ सोडून दिले होते. 4 फेब्रुवारीला पोलिसांनी बबलुला मालकाकडे सोपवले. या अपहरण नाटयात बबलुचा जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास झाला.