जोधपूर - बांगड्या, मणी अन् मातीची भांडी...अशा गोष्टी पाकिस्तानी सीमेजवळील जोधपूरमध्ये सापडल्या आहेत. अलीकडेच भारतीय पुरातत्व विभागाने एक नवीन रिसर्च सुरू केला आहे. त्यात हडप्पा संस्कृतीशी मिळत्या जुळत्या काही गोष्टी हाताशी लागल्या आहेत.
भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञांना राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यातील रताडिया री डेरी येथे ४५०० वर्षे जुन्या हडप्पा ठिकाणाचे पुरावे सापडले आहेत. हे ठिकाण रामगड तहसीलपासून ६० किमी अंतरावर आहे तर पाकिस्तान सीमेजवळील साडेवाला गावापासून अवघ्या १७ किमी अंतरावर आहे. राजस्थान विद्यापीठातील इतिहास आणि भारतीय संस्कृती विभागातील संशोधक दिलीप कुमार सैनी, इतिहासकार पार्थ जगानी, राजस्थान विद्यापीठ, उदयपूरचे प्राध्यापक जीवन सिंग खरवाल आणि राजस्थान विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. तमेघ पनवार, डॉ. रवींद्र सिंग जाम आणि रामगढचे प्रदीप कुमार गर्ग यांनी हा शोध लावला आहे.
थार परिसरातील वाळवंटात पहिल्यांदाच पुरातत्वीय ठिकाण सापडले आहे. हा शोध इंडियन जर्नल ऑफ सायन्समध्ये प्रकाशित झाला आहे. येथे काही जुन्या गोष्टी सापडल्या आहेत. या गोष्टी लाल आणि गव्हाच्या रंगाच्या मातीच्या भांड्या आहेत. यामध्ये वाट्या, घागर, कप आणि छिद्रे असलेले भांडे समाविष्ट आहेत. ही मातीची भांडी हाताने बनवण्यात आली असून तिला वेगवेगळे आकार दिले आहेत. काही दगडी पाती देखील सापडल्या आहेत, ज्या ८-१० सेमी लांबीच्या आहेत. विशेष म्हणजे रताडिया री डेरी येथे सापडलेल्या गोष्टी आहेत त्या पाकिस्तान मिळणाऱ्या एका दगडापासून बनवण्यात आल्या आहेत. माती आणि शंखांपासून बनवलेल्या बांगड्या देखील सापडल्या आहेत. काही त्रिकोणी, गोल आणि इडलीच्या आकाराचे टेराकोटा केक देखील सापडले आहेत. टेराकोटा केक म्हणजे मातीपासून बनवलेल्या बेक केलेल्या वस्तू असतात.
दरम्यान, हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वात विकसित संस्कृती मानली जाते. याआधी सिंधू नदीवर आधारित सिंधू संस्कृती असे नाव देण्यात आले होते. नंतर हडप्पा ठिकाणांच्या नावावरून तिला हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले. ही संस्कृती पूर्णपणे शहरी संस्कृती होती. ज्यामध्ये रुंद रस्ते एकमेकांना काटकोनात कापत असत. घरे आणि रस्त्यांच्या कडेला पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था असायची. ही खासियत त्या काळात जगातील कोणत्याही संस्कृतीला वारशाने मिळाली नव्हती.