समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 10:25 IST2025-10-26T10:23:48+5:302025-10-26T10:25:24+5:30
बाहुबली नेते स्टेजवर पोहोचताच स्टेज कोसळला आणि ते जोरात खाली पडले.

फोटो - आजतक
माजी आमदार अनंत सिंह यांना जेडीयूने य़ावेळी मोकामा येथून तिकीट दिलं आहे. निवडणूक प्रचारामध्ये त्यांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. शनिवारी अनंत सिंह मोकामाच्या पूर्व भागात संपर्क अभियान राबवत होते. याच दरम्यान ते एका जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी आले. बाहुबली नेते स्टेजवर पोहोचताच स्टेज कोसळला आणि ते जोरात खाली पडले.
सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अनंत सिंह यांच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने उचललं. त्यानंतर, ते ताबडतोब त्यांच्या कारमध्ये बसले आणि दुसऱ्या ठिकाणी निघून गेले. अनंत सिंह हे स्टेजवर असताना स्टेज कसा कोसळला याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये समर्थक "जिंदाबाद, जिंदाबाद" च्या घोषणा देत असल्याचं दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामपूर-डुमरा गावात समर्थकांनी अनंत सिंह यांच्यासाठी एक छोटासा स्टेज उभारला होता. जेव्हा माजी आमदार गावात आले तेव्हा लोकांनी त्यांना मंचावरून जनतेला संबोधित करण्याची विनंती केली. निवडणुकीचा माहोल असल्यामुळे, अनंत सिंह त्यांच्या समर्थकांना यासाठी नकार देऊ शकले नाहीत आणि ते मंचावर गेले.
मंचावर उपस्थित असलेल्या एक समर्थक माईक हाताता घेऊन भाषण देत होता. त्याचं भाषण सुरू असताना इतर लोक अनंत सिंह जिंदाबादच्या मोठमोठ्याने घोषणा देत होते. याच दरम्यान स्टेज अचानक कोसळला आणि बाहुबली नेते खाली पडले. या घटनेनंतर काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.