अनंत अंबानींची १४० किमी पदयात्रा; जामनगर ते द्वारका रोज रात्री प्रवास, १० एप्रिलला वाढदिवसापूर्वी घेणार द्वारकाधिशाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 10:49 IST2025-04-02T10:49:35+5:302025-04-02T10:49:44+5:30
Anant Ambani: रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी जामनगर ते द्वारका अशी १४० किमी पदयात्रा सुरू केली आहे. १० एप्रिल रोजी अनंत यांचा ३०वा वाढदिवस असून, त्यापूर्वी ते द्वारकेत भगवान द्वारकाधिशांचे आशीर्वाद घेतील.

अनंत अंबानींची १४० किमी पदयात्रा; जामनगर ते द्वारका रोज रात्री प्रवास, १० एप्रिलला वाढदिवसापूर्वी घेणार द्वारकाधिशाचे दर्शन
जामनगर (गुजरात) : रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी जामनगर ते द्वारका अशी १४० किमी पदयात्रा सुरू केली आहे. १० एप्रिल रोजी अनंत यांचा ३०वा वाढदिवस असून, त्यापूर्वी ते द्वारकेत भगवान द्वारकाधिशांचे आशीर्वाद घेतील.
पाच दिवसांपूर्वी सुरू केलेल्या या पदयात्रेत अनंत अंबानी रोज रात्री ठरावीक किलोमीटर अंतर चालतात. यादरम्यान मार्गावरील विविध मंदिरांत ते दर्शन घेतात. आतापर्यंत त्यांनी सुमारे ६० किमी अंतर पार केले आहे. आणखी पाच दिवस ही यात्रा चालेल.
पदयात्रेचा हा आहे उद्देश
अनंत यांनी सांगितल्यानुसार, या पदयात्रेच्या माध्यमातून ते युवकांना धर्माबद्दल आस्था ठेवावी, असा संदेश देऊ इच्छित आहेत. ५ दिवसांपासून हा प्रवास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रोज रात्रीच पायी प्रवास
रोज रात्री ते हा प्रवास करतात. दिवसा वाहतूक आणि इतर बाबींचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रात्रीच जास्तीत जास्त प्रवास करण्याचे ठरवले आहे.
झेड प्लस सुरक्षा, पोलिसही
या यात्रेत अनंत अंबानी यांच्यासोबत त्यांच्यासाठी असलेली झेड-प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. हे जवान जशी सुरक्षेची काळजी घेत आहेत, तशीच काळजी त्या-त्या भागातील स्थानिक पोलिसही घेत आहेत.
वाचवले शेकडो कोंबड्यांचे प्राण
भक्तिमार्गावरील या पदयात्रेत अनंत अंबानी यांनी कत्तलखान्यात नेल्या जात असलेल्या शेकडो कोंबड्यांचे प्राण वाचवल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या सर्व कोंबड्या अनंत यांनी दुप्पट किमतीला खरेदी केल्या व त्या आता काळजीपूर्वक पाळल्या जातील.