अवघ्या १० रुपयांत भरपेट जेवण देणारा तरुण; आनंद महिंद्राही झाले फॅन, म्हणाले...भाई पत्ता दे मीही मदत करतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 16:02 IST2022-12-07T16:00:55+5:302022-12-07T16:02:17+5:30
देशातील दिग्गज उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियात चांगलेच सक्रिय असतात.

अवघ्या १० रुपयांत भरपेट जेवण देणारा तरुण; आनंद महिंद्राही झाले फॅन, म्हणाले...भाई पत्ता दे मीही मदत करतो!
नवी दिल्ली-
देशातील दिग्गज उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियात चांगलेच सक्रिय असतात. समाजिक विषयांवर आणि देशातील विविध कलागुणांची ते सोशल मीडियाच्या माध्यमातून दखल घेत असतात. त्यांनी केलेली एक पोस्ट क्षणार्धात व्हायरल होते आणि देशभर चर्चा सुरू होते. आता त्यांनी केलेले नवं ट्विट चर्चेचा विषय बनलं आहे. आनंद महिंद्रा यांनी इंदौरमध्ये अवघ्या १० रुपयांत भरपेट जेवण देणाऱ्या अवलिया तरुणाची दखल घेतली आहे. त्याचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर @thebetterindia च्या ट्विटर हँडलवर अपलोड करण्यात आलेला १ मिनिट ४६ सेकंदाचा व्हिडिओ रिट्विट केला आहे. या व्हिडिओत अवघ्या १० रुपयांत भरपेट जेवण देणाऱ्या तरुणाची कहाणी सांगण्यात आली आहे. हंगर-लंगर नावानं दुकान सुरू करुन २६ वर्षीय शिवम सोनी यानं हे उल्लेखनीय काम सुरू केलं आहे.
What a powerful story. Life continues to teach us that the best way to heal ourselves is to help others. I guess he’s gathered external supporters to fund his langar. I’d be very privileged if I could add my support too. Request @thebetterindia to provide his contact details https://t.co/mAP8sYXVPq
— anand mahindra (@anandmahindra) December 7, 2022
व्हिडिओत पाहता येईल की शिवम सोनीच्या दुकानात मसाला डोसा, इडली सांबर, मटर पुलाव, खमन ढोकळा इत्यादी पदार्थ उपलब्ध आहेत. महत्वाची बाब अशी की यातला कोणताही पदार्थ अवघ्या १० रुपयांत दिला जात आहे. सामान्यत: याच पदार्थांसाठी कोणत्याही हॉटेलात गेलं की १०० ते २०० रुपये सहज मोजावे लागतात.
कॉलेज ड्रॉपआऊट आहे शिवम सोनी
Hunger Langar नावानं गरीबांचं पोट भरण्यासाठी सुरू केलेल्या शिवम सोनीच्या या उपक्रमाकडे आज समाजसेवाचा आदर्श म्हणून पाहिलं जात आहे. शिवम सोनी कॉलेज ड्रॉप आऊट विद्यार्थी आहे. तो घर सोडून इंदौरमध्ये आला आणि खानावळीत जेवण करुन, रेल्वे स्टेशनवर झोपून त्यानं दिवस काढले आहेत. आपबिती पाहूनच त्यानं गरीबांचं पोट भरण्याचा निश्चय केला. आज त्याचं सर्वजण कौतुक करत आहेत. आता आनंद महिंद्रा यांनीही शिवम सोनीची दखल घेतली आहे.
आनंद महिंद्रांनी मागितला पत्ता
आनंद महिंद्रा यांनी शिवम सोनीचा व्हिडिओ तर शेअर केलाच पण त्याचं तोंडभरुन कौतुकही केलं आहे. इतकंच नव्हे, तर त्याचा पत्ता देखील मागितला आहे. "दमदार कहाणी आहे...इतरांची मदत करणं हेच स्वत:ला ठीक करण्याचा उत्तम मार्ग आहे. मला वाटतं की लंगर चालवण्यासाठी त्यानं बाहेरुन मदत घेतली आहे. माझीही मदतीची इच्छा आहे. मलाही हातभार लावता आला तर आनंद होईल", असं आनंद महिंद्रांनी म्हटलं आहे. तसंच शिवम सोनी याचा मोबाइल नंबर आणि पत्ता देखील मागितला आहे.