Almora Landslide: गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते बंद असून वीज आणि पाणीपुरवठा बंद झाला आहे. डोंगराळ भागातून दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. उत्तराखंडमधील अल्मोडा येथेही दरड कोसळ्याची भयंकर घटना समोर आली आहे. दुर्दैवाने डोंगरावरून पडलेल्या दगडाचा धक्का बसून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. तिथली परिस्थिती पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
उत्तराखंडमधील अल्मोडातील भिकियासैन-बसोत रस्त्यावर दगड पडल्याने एक वृद्ध जखमी झाला होता. सीएचसी भिकियासैन येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला उच्च केंद्रात रेफर करण्यात आले. मंगळवारी, पिपलगाव येथील रहिवासी ६१ वर्षीय फकीर सिंह संध्याकाळी घरी जात होते. त्याचवेळी दरड कोसळण्यास सुरुवात झाली. दरड कोसळत असताना फकीर सिंह यांनी तिथून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र एक भलामोठा दगड त्यांच्या दिशेने आला आणि डोक्याला लागला. त्यामुळे फकीर सिंह जखमी झाले आणि तिथेच बसले. यानंतर आणखी दगड कोसळण्यास सुरुवात झाल्याने त्यांना तिथून वाचवता आलं नाही.
दरड कोसळणे थांबल्यानंतर लोकांनी सिंह यांना खेचून बाहेर काढलं. त्यानंतर एका गाडीतून सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मोठ्या प्रमाणात दगड कोसळत असल्याने सिंह हे वाचणार नाहीत असंच सगळ्यांना वाटत होतं. मात्र सुदैवाने ते एका बाजूला पडल्याने जीवितहानी झाली नाही. ही संपूर्ण घटना तिथल्या एका व्यक्तीने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केली.
दुसरीकडे, हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये भूस्खलन झाल्यामुळे दोन जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. मंगळवारी रात्री उशिरा कुल्लूच्या आखाडा बाजार परिसरात ही घटना घडली. माहिती मिळताच एनडीआरएफ, पोलिस आणि प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य सुरू केले.घराच्या एका खोलीत एनडीआरएफचा एक जवान राहत होता, तर दुसऱ्या खोलीत दोन काश्मिरी कामगार राहत होते. भूस्खलनाच्या वेळी एका मजुराने खिडकीतून उडी मारून आपला जीव वाचवला. तर इतर दोघे ढिगाऱ्याखाली गाडले गेले.