अमित शहांच्या गुगलीनंतर १५ ज्येष्ठ नेत्यांना राजकारणात पुन्हा आशेचा किरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 03:32 IST2017-08-22T03:32:28+5:302017-08-22T03:32:40+5:30
तीन वर्षांपासून सक्रीय राजकारणातून बाजूला केल्या गेलेल्या भाजपातील पंचाहत्तरी ओलांडलेल्या १५ ज्येष्ठ नेत्यांना राजकारणात पुन्हा आशेचा किरण दिसू लागला आहे.

अमित शहांच्या गुगलीनंतर १५ ज्येष्ठ नेत्यांना राजकारणात पुन्हा आशेचा किरण
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : तीन वर्षांपासून सक्रीय राजकारणातून बाजूला केल्या गेलेल्या भाजपातील पंचाहत्तरी ओलांडलेल्या १५ ज्येष्ठ नेत्यांना राजकारणात पुन्हा आशेचा किरण दिसू लागला आहे. कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन ज्यांना राज्यपाल म्हणून पाठविण्यात आले त्या नजमा हेपतुल्ला आणि ज्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे ते लघु व मध्यम उद्योगाचे मंत्री कलराज मिश्र यांचाही या ज्येष्ठ नेत्यात समावेश आहे.
पंचाहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना निवडणूक लढविण्याची मनाई नाही, असे अमित शहा यांनी भोपाळमध्ये एका बैठकीत सांंगितले आणि ७५ वयावरील नेत्यांना बाजूला करण्याच्या फॉर्म्युल्याला त्यांनी केराची टोपली दाखविली. या ज्येष्ठ नेत्यात एल. के. अडवाणी, आनंदीबेन पटेल, मुरलीमनोहर जोशी , सी.पी. ठाकूर, हुकुमदेव नारायण यादव, यशवंत सिन्हा, करिया मुंडा, प्रेमकुमार धुमल आदी नेत्यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुका २० महिने दूर असताना आणि याच काळात ११ राज्यांच्या निवडणुका होणार असताना सत्तरीतील हे ज्येष्ठ नेते पक्षाला नुकसान पोहचवू शकतात, अशी शक्यता आहे. विद्यमान खासदारांपैकी कुणालाही हे ठाऊक नाही की त्यांना निवडणुकीत तिकिट दिले जाणार आहे अथवा नाही.