Amit Shah Meet Sharad Pawar : नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज (दि.१२) ८५ वा वाढदिवस आहे. दरम्यान, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील शरद पवारांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अमित शाह ६ जनपथ निवासस्थानी दाखल झाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांचे स्वागत केले. काहीच मिनिटांत अमित शाह आणि शरद पवार यांची भेट झाली. अमित शाह यांनी पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांचा सत्कार केला, तसेच निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.
आज शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार कुटुंबियांसह त्यांना भेटायला गेले होते, त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांनीच भुवया उंचावल्याचे पाहिला मिळाले. तसेच, अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच अमित शाह यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा की, भेटीमागे काही वेगळे राजकारण आहे? अशा चर्चांनाही सुरुवात झाली आहे.