पटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएची तयारी सुरू आहे. त्यातच गृहमंत्री अमित शहा बिहारच्या दौऱ्यावर आहेत. रोहतासमध्ये १० जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांना अमित शाह यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाह यांनी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र देत राहुल गांधी, लालू प्रसाद यादव यांच्यावर हल्लाबोल केला.
शाह म्हणाले की, आज १० जिल्ह्यांतील निवडक कार्यकर्त्यांची बैठक होती. सकाळी मला एका पत्रकाराचा फोन आला, निवडणुकीचा हंगाम आहे. तुम्ही रॅली काढण्याऐवजी कार्यकर्त्यांना का भेटत आहात? असं त्यांनी विचारले. त्यावर मी त्यांना सांगितले, इतर पक्ष निवडणूक नेत्याच्या नावावर जिंकतात. माझ्या पक्षात निवडणुका माझ्या कार्यकर्त्यांनी जिंकल्या आहेत आणि म्हणूनच आमच्यात कोणताही राष्ट्रीय नेता असा आहे ज्याने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बूथ कार्यकर्ता म्हणून केली आहे असं त्यांनी सांगितले.
आजच्या बैठकीत रोहतास, बक्सर, भोजपूर, कैमूर, गया, नवादा, अरवल, जहानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सहभागा घेतला होता. यावेळी शाह यांनी त्यांच्या शैलीत लालू प्रसाद यादव आणि राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला. नितीश कुमार यांच्या सरकारने बिहारसाठी जे काही केले आहे ते ते घराघरात पोहोचवा. तुमचा आवाज राहुल गांधींपर्यंत पोहोचला पाहिजे असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. घुसखोरांना मतदानाचा अधिकार आहे का? घुसखोरांना रेशन मिळावे का? त्यांना आयुष्मान कार्ड मिळावे का? त्यांना मतदानाचा अधिकार आहे का? असा सवाल त्यांनी लोकांना विचारत राहुल गांधींवर निशाणा साधला.
दरम्यान, एनडीए सरकारने जे काम केले, ते लालू प्रसाद यादव त्यांच्या संपूर्ण आयुष्यात काम केले तरीही पूर्ण करू शकले नाहीत. त्यांनी चारा घोटाळा, नोकरीसाठी जमीन घोटाळा आणि जेलमध्येही घोटाळा केला. इतके भ्रष्टाचाराचे आरोप असलेले यूपीए सरकार बिहारचे काही भले करू शकेल का? एकीकडे भ्रष्ट सरकार आहे आणि दुसरीकडे मोदींचे सरकार आहे, ज्याच्याकडे भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही असंही अमित शाह यांनी म्हटलं.