Amit Shah VS K.C.Venugopal: गंभीर गुन्हेगारी आरोपांखाली अटक झाल्यास किंवा ताब्यात घेतल्यास पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री किंवा मंत्री यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची तरतूद करण्यासाठी सरकारने बुधवारी संसदेत तीन विधेयके सादर केली. गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत ही विधेयके सादर केली. यादरम्यान बराच गोंधळ पाहायला मिळाला. विरोधकांनी या विधेयकाला विरोध करत ते फाडून सभागृहात फेकून दिले. यावेळी काँग्रेस खासदार केसी वेणुगोपल आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. केसी वेणुगोपाल यांनी केलेल्या आरोपांना अमित शहा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान दुरुस्ती विधेयकासह तीन विधेयके सादर केली. ही तीन विधेयके सादर होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी 'संविधान मोडू नका' अशा घोषणा दिल्या. या विधेयकानुसार, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्यांना कोणत्याही गुन्ह्यात सहभागी असल्यास ३० दिवसांच्या आत राजीनामा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विरोधकांच्या गोंधळादरम्यान, काही खासदारांनी अमित शहांवर कागद फेकले. खासदार ओवेसी यांनी या विधेयकाला विरोध केला आणि इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या प्रचंड गोंधळादरम्यान, लोकसभेचे कामकाज दुपारी ३:०० वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
यावेळी काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल संविधान दुरुस्ती विधेयक १३० च्या विरोधात बोलत होते. यावेळी त्यांनी आरोप केला की अमित शहा गुजरातचे गृहमंत्री असताना त्यांनी नीतिमत्ता पाळली नाही. या मुद्द्यावर अमित शहा यांनी वेणुगोपाल यांना प्रत्युत्तर दिलं. मी गृहमंत्र्यांना एक प्रश्न विचारू शकतो का? जेव्हा ते गुजरातचे गृहमंत्री होते तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता का?, असा सवाल वेणुगोपाल यांनी केला.
त्यानंतर वेणुगोपाल यांना थांबवत अमित शहा त्यांच्या जागेवरून उठले आणि म्हणाले, "माझे ऐका, आधी खाली बसा. माझ्यावर खोटे आरोप लावण्यात आले होते हे मला स्पष्ट करायचे आहे. मी नैतिक मूल्यांचा आधार घेत राजीनामा दिला. मला अटक होण्यापूर्वी मी माझ्या पदाचा राजीनामा दिला. जोपर्यंत मी न्यायालयाकडून निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत मी कोणतेही पद भूषवले नाही. आपण एवढे निर्लज्ज होऊ शकत नाही की आरोप लागल्यावरही पदावर राहू."