यूपीतील अमेठी येथून एक असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे लोकांना मोठा धक्का बसला आहे. कमरोली पोलीस स्टेशन परिसरातील गावात राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या पत्नीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज होऊन अनोखं पाऊल उचललं. पतीने स्वतःच आपल्या पत्नीचं तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिलं होतं. पण आता या संपूर्ण घटनेत एक नवा ट्विस्ट आला आहे, कारण पत्नीने तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवशंकर प्रजापती याचं लग्न २ मार्च २०२५ रोजी कमरोली पोलीस स्टेशन परिसरातील उमा प्रजापतीशी झालं होतं. लग्न मोठ्या थाटामाटात झालं, परंतु वैवाहिक जीवन सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच भांडणं सुरू झाली. लग्नानंतरही उमा तिच्या प्रियकराच्या संपर्कात होती. ती सतत फोनवर बोलत असे आणि त्याला भेटायलाही जात असे. ही गोष्ट दोघांच्या वैवाहिक जीवनात तणावाचं कारण बनू लागली.
सततच्या भांडणांमुळे आणि नात्यात वाढता दुरावा निर्माण झाल्यानंतर पतीने असा निर्णय घेतला की, सर्वांना धक्का बसला. शिवशंकरने आपल्या पत्नीच्या प्रियकराला बोलावून मंदिरात त्यांचं लग्न लावलं. मात्र आता लग्नानंतर पत्नीने पतीवरच अनेक आरोप केले. उमा म्हणते की, तिला तिचा पती शिवशंकरसोबत राहायचं आहे, परंतु तिच्या पतीचे दुसऱ्याच महिलेशी संबंध आहेत. तिने पोलिसांवर गंभीर आरोप केले आणि पोलिसांच्या संगनमताने जबरदस्तीने लग्न झाल्याचं सांगितलं.
उमा स्पष्ट शब्दात म्हणाली, "मला माझ्या पतीसोबत राहायचं आहे. मी स्वतःच्या इच्छेने लग्न केलं हे सर्व खोटं आहे. पोलिसांनी दबाव आणून आमची फसवणूक केली आणि जबरदस्तीने हे लग्न लावलं. माझ्या पतीचे दुसऱ्याच महिलेशी प्रेमसंबंध आहेत, म्हणूनच तो मला अडकवत आहे. पोलिसांनी आम्हाला मारहाण केली आणि लग्न करण्यास भाग पाडलं." या घटनेची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.