भारतातही काेसळणार का स्नो बॉम्ब?; जागतिक तापमान वाढीचा परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 12:33 PM2023-01-08T12:33:38+5:302023-01-08T12:34:51+5:30

अमेरिकेत सध्या बर्फाच्या चक्रीवादळाने अर्थात स्नो बॉम्बने थैमान माजविले आहे. तिथे आलेले हे बर्फाचे चक्रीवादळ गेल्या 25 वर्षांतील सर्वाधिक हानिकारक ठरले आहे.

America is currently hit by a snow storm; Will the snow bomb explode in India? | भारतातही काेसळणार का स्नो बॉम्ब?; जागतिक तापमान वाढीचा परिणाम 

भारतातही काेसळणार का स्नो बॉम्ब?; जागतिक तापमान वाढीचा परिणाम 

googlenewsNext

- सचिन लुंगसे

अमेरिकेच्या समुद्रावरुन वाहणारे उष्ण वारे, समुद्री प्रवाह आणि उत्तर ध्रुवावरून वाहणारे थंड वारे यांचा संगम झाल्याने बर्फाची वादळे येतात. यामुळे थंड वाऱ्याचा वेग प्रचंड  वाढतो. तापमान अचानक कमी होते. हवामानाच्या अशा बदलाने बर्फाचे चक्रीवादळ तयार होते.  जागतिक तापमान वाढ बर्फाच्या चक्रीवादळास कारणीभूत आहे. अमेरिकेत आता आलेले बर्फाचे चक्रीवादळ गेल्या पंचवीस वर्षांतील सर्वाधिक हानीकारक वादळ आहे.  भारतातील स्थिती वेगळी असल्याने भारतात बर्फाचे चक्रीवादळ येऊ शकत नाही. परंतु अमेरिकेतील बर्फाच्या चक्रीवादळामुळे उत्तर भारतातील तापमानात घट नोंदविली जाते आणि बर्फवृष्टी होते.

अमेरिकेत ट्रॉपिकल आणि विंटर सायक्लॉनपण येतात. ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटीबंधीय चक्रीवादळे होय. विंटर सायक्लॉनला तिकडे बॉम्ब सायक्लॉन किंवा ब्लिझार्ड म्हणतात. गेल्या काही वर्षांत अमेरिकेत बर्फाच्या चक्रीवादळाचे प्रमाण वाढले आहे. उत्तर ध्रुवाकडून येणारे थंड वारे जेव्हा वाढतात, तेव्हा त्याचवेळी समुद्राकडील उष्ण वारे उत्तरेकडे वाहू लागतात. मधोमध या दोन्ही वाऱ्यांचा संगम होतो. त्याला आपण कमी आणि उच्च दाबाचे क्षेत्र असे म्हणतो. उत्तरेकडे उच्च दाबाचे क्षेत्र तयार होते, तर शहरावर म्हणजे मध्य भूमीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. अशावेळी थंड वारे वेगाने खाली वाहतात. जमिनीवरील तापमान वाढल्याने असे घडते. पूर्वी जमिनीवरील तापमान एवढे नव्हते. 

कशामुळे येतात बर्फाची वादळे?

तापमान वाढीमुळे दक्षिण गोलार्धात जेवढी वादळे येतात, त्यापेक्षा जास्त उत्तर गोलार्धात येतात. उत्तर अमेरिकेच्या जवळून गल्फ स्ट्रीम जाते. उष्ण वाऱ्याचा जो प्रवाह आहे, त्याला आपण ओशियन करंट म्हणतो. पृथ्वीवर दोन्हीकडे ओशियन करंट आहे.  दक्षिण आणि उत्तर असा दोन्हीकडे ओशियन करंट आहे. विषुववृत्तावरील गरम पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे गरम होते. हे गरम पाणी उत्तर आणि दक्षिणकडे ध्रुव प्रदेशात जाते. या पाण्याचे प्रवाह अमेरिकेहून उत्तरेकडे जातात. म्हणून येथील भाग जास्त गरम होतो. हा गरम प्रदेश आणि विरुद्ध दिशेकडून येणारे थंड वारे यांचा संगम होतो. परिणामी अशी वादळे तिकडे तयार होतात.

जागतिक तापमान वाढीचा परिणाम 

चक्रीवादळाची संख्या वाढते आहे. त्याची तीव्रता वाढते आहे. जागतिक तापमान वाढ होत असल्याने अशा चक्रीवादळाचे प्रमाण वाढते आहे. अमेरिकेची भौगोलिकता पाहिली तर, पश्चिम आणि दक्षिणेला समुद्र आहे. पूर्वेलाही समुद्र आहे. उत्तरेकडे मात्र समुद्र नाही. उत्तरेला बर्फाळ प्रदेश आहे. उत्तर ध्रुव आहे. त्यामुळे तिकडे अशी चक्रीवादळे येतात. अशी स्थिती आपल्याकडे बंगालच्या खाडीत आहे. म्हणून बंगालच्या खाडीकडून चक्रीवादळे येतात. मात्र आपल्याकडे उत्तरेकडे उत्तर ध्रुव जवळ नाही. बर्फाळ प्रदेश नाही. अमेरिकेत बर्फाळ प्रदेश आहे. 

बर्फाची चक्रीवादळे भारतात शक्य आहेत?

भारताची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. उत्तर भारताच्या पलीकडे चीन आणि रशिया आहे. उत्तर ध्रुवाजवळ हा भाग नाही. इकडे बर्फाळ प्रदेश नाही. त्यामुळे ज्या वेगाने थंड वारे अमेरिकेत येतात, त्या वेगाने ते आपल्याकडे येत नाहीत. समुद्रावरून येणारे गरम वारे व उत्तरेकडून वाहणारे थंड वारे यांचा भारतात संगम होत नाही. त्यामुळे भारतात बर्फाची चक्रीवादळे येत नाहीत. मात्र अमेरिकेत आलेल्या बर्फाच्या वादळामुळे उत्तर भारतातील तापमान कमी होते. त्यामुळे मोठया प्रमाणावर हिमवर्षावर होतो. चक्रीवादळासाठी थंड आणि उष्ण वाऱ्याचा संगम व्हावा लागतो; तो येथे होत नाही. येथील भौगोलिक घटक त्यास कारणीभूत आहेत. 

लोकल ते ग्लोबल

जागतिक तापमान वाढीचा फटका यापुढे बसू नये म्हणून ‘लोकल ते ग्लोबल’ अशा उपाययोजना कराव्या लागतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रदूषण कमी करावे लागेल. आहेत ती जंगले टिकवावी लागतील. अधिकाधिक झाडे लावावी लागतील. जागतिक तापमान वाढीला कारणीभूत असलेल्या प्रत्येक घटकावर नियंत्रण आणावे लागेल. नियंत्रण आणून भागणार नाही, तर यासाठी लोकल ते ग्लोबल असा प्रवास करताना जागतिक स्तरावरील प्रत्येक देशाने पुढाकार घेत तापमान वाढ कमी करण्यासाठी जे-जे करायचे आहे ते-ते करण्यासाठी जागतिक स्तरावर एक संयुक्तिक असा कृती कार्यक्रम आराखडा राबविण्याची गरज आहे. त्याची अंमलबजावणी प्रत्येक स्तरावर वेगाने करण्याची गरज येऊन ठेपली आहे, असे उपाय सुचवत ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष आणि पर्यावरण तज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी या लेखासाठी मार्गदर्शन करत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संदर्भ दिले आहेत.

Web Title: America is currently hit by a snow storm; Will the snow bomb explode in India?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.