काळीज पिळवटून टाकणारी घटना; भावाचं पार्थिव हाती घेऊन 'तो' रस्त्यावर धावत राहिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 23:13 IST2022-08-27T23:13:39+5:302022-08-27T23:13:50+5:30
बागपतमध्ये दिल्ली यमुनोत्री हायवेवर सावत्र आई सीतानं रागाने तिच्या २ वर्षीय मुलाला रस्त्यावर फेकले

काळीज पिळवटून टाकणारी घटना; भावाचं पार्थिव हाती घेऊन 'तो' रस्त्यावर धावत राहिला
बागपत - उत्तर प्रदेशातील बागपत येथे माणुसकीला काळीमा फासणारी आणि सरकारी यंत्रणेविरोधात संताप आणणारी दुर्देवी घटना घडली आहे. क्रूर आईनं मारलेल्या मुलाचा मृतदेह घरापर्यंत पोहचवण्यासाठी प्रत्येकाने दुर्लक्ष केले. त्यामुळे वडील आणि १० वर्षाच्या भावाला लहान भावाचं पार्थिव हातात उचलून रस्त्यातून चालावं लागलं. सोशल मीडियात या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
बागपतमध्ये दिल्ली यमुनोत्री हायवेवर सावत्र आई सीतानं रागाने तिच्या २ वर्षीय मुलाला रस्त्यावर फेकले. तेव्हा वेगाने येणाऱ्या कारने मुलाला धडक दिली आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. सूचना मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत महिलेला अटक केली आणि मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण मुलाचा मृतदेह वडिलांकडे सोपवला. परंतु माणुसकीला लाजवणारा प्रकार घडला. हॉस्पिटलने मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहनही उपलब्ध करून दिले नाही.
त्यामुळे मृतदेह हातात घेऊन भाऊ आणि वडील घराच्या दिशेने निघाले. मुलाचा मृतदेह त्याचा भाऊ आणि वडील रस्त्यात एकमेकांकडे देत राहिले. खूप वेळ मृतदेह पकडून वडील थकल्यानंतर भावाच्या हाती मृतदेह सोपवला. तर भाऊ थकल्यानंतर वडिलांकडे मृतदेह द्यायचा. वडिलांकडे इतकेही पैसे नव्हते जेणेकरून खासगी रुग्णवाहिका येऊ शकेल.