राफेलच्या मुद्द्यावर पत्रप्रपंचानंतर अंबानींनी काँग्रेसला पाठवली कायदेशीर नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 14:05 IST2018-08-22T14:04:27+5:302018-08-22T14:05:10+5:30
राफेल प्रकरणावरून काँग्रेस आणि मोदी सरकारमधला संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. परंतु या वादात अनिल अंबानींची सरशी होत असल्याचं पाहायला मिळतंय.

राफेलच्या मुद्द्यावर पत्रप्रपंचानंतर अंबानींनी काँग्रेसला पाठवली कायदेशीर नोटीस
नवी दिल्ली- राफेल प्रकरणावरून काँग्रेस आणि मोदी सरकारमधला संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. परंतु या वादात अनिल अंबानींची सरशी होत असल्याचं पाहायला मिळतंय. राफेलच्या मुद्द्यावरून अनिल अंबानी यांनी आतापर्यंत राहुल गांधींना दोन पत्र लिहिलं आहेत. तसेच या पत्रांतून राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचं खंडनही करण्यात आलं आहे. तरीही काँग्रेस आणि राहुल गांधी राफेलच्या मुद्द्यावरून अंबानी आणि मोदींवर आरोप करत सुटले आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर आता अनिल अंबानींनी काँग्रेसला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अंबानींनी काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी काँग्रेसला गंभीर इशारा दिला आहे. काँग्रेसनं बिनबुडाचे आरोप लावू नयेत. त्यांच्याकडे पुरावे असतील तरच बोलावे. तसेच काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी चुकीची माहिती पसरवू नये.
काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, अशोक चव्हाण, संजय निरुपम, अभिषेक मनू सिंघवी, इतर नेते आमच्या ग्रुपवर गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळे रिलायन्सनं याविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. नोटीसमध्ये लिहिलं आहे की, सर्व नेत्यांनी राइट टू फ्रीडम आहे. परंतु त्यांनी त्या अधिकाराचा जबाबदारीनं वापर केला पाहिजे. काँग्रेस पक्ष रिलायन्स ग्रुपविरोधात कॅम्पेन चालवत आहे. राफेलच्या मुद्द्यावर जयवीर शेरगिल हे भाजपा आणि सरकारला वारंवार घेरत आहेत.