'ममतांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता', अमर्त्य सेन यांच्या कौतुकानंतर, काय म्हणाल्या TMC नेत्या? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 00:58 IST2023-01-17T00:56:29+5:302023-01-17T00:58:37+5:30
अमर्त्य सेन यांनी नुकतेच म्हटले होते की, 2024 ची लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) बाजूने एकतर्फी होईल, असा विचार करणे चुकीचे आहे.

'ममतांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता', अमर्त्य सेन यांच्या कौतुकानंतर, काय म्हणाल्या TMC नेत्या? वाचा...
नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी केलेल्या कौतुकानंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जाम खूश झाल्याचे दिसत आहे. सेन यांचा सल्ला आपल्यासाठी आदेश असल्याचे ममता यांनी सोमवारी म्हटले आहे. सेन यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा बॅनर्जी यांच्यात देशाचे पुढील पंतप्रधान होण्याची क्षमता असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर, ममता म्हणाल्या, अर्थशास्त्रज्ञ हे जगप्रसिद्ध विचारवंत आहेत आणि त्यांचे ज्ञान आपल्याला मार्ग दाखवते. त्याचा सल्ला माझ्यासाठी आदेश आहे. देशातील सद्य परिस्थितीचे त्यांचे ज्ञान आणि आकलन सर्वांनी गांभीर्याने घ्यायला हवे.
अमर्त्य सेन यांनी नुकतेच म्हटले होते की, 2024 ची लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) बाजूने एकतर्फी होईल, असा विचार करणे चुकीचे आहे. येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची असेल. टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याकडे भारताच्या पुढील पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांमध्ये भाजप प्रती जनतेच्या मनात असलेली नाराजीची ताकद आकर्षित करण्याची क्षमता आहे, की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्वाची -
पीटीआयला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सेन म्हणाले, “मला वाटते की, प्रादेशिक पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. द्रमुक हा महत्त्वाचा पक्ष आहे, टीएमसी नक्कीच महत्त्वाची आहे आणि समाजवादी पक्षाचाही काही प्रभाव आहे, पण तो वाढवता येईल का, हे मला माहीत नाही."
एवढेच नाही, तर, ते म्हणाले, "मला वाटते की भाजपची जागा दुसरा कोणताही पक्ष घेऊ शकत नाही, असे मानणे चुकीचे ठरेल, कारण त्यांनी स्वतःला एक असा पक्ष म्हणून स्थापित केले आहे, की ज्याचा उरवरीत देशाच्या तुलनेत हिंदूंकडे अधीक कल आहे.