पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नेते आणि मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (MQM) चे संस्थापक अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत करण्याची विनंती केली आहे.
अल्ताफ हुसेन यांनी फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या निर्वासितांना होणाऱ्या छळाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उपस्थित करण्याची पंतप्रधान मोदींना विनंती केली आहे. लंडनमधील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे आवाहन केलं. तसेच मोदींचं भरभरून कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदींनी निर्वासितांसाठीही आवाज उठवावा अशी विनंती केली. निर्वासितांचा अनेक दशकांपासून छळ आणि भेदभाव केला जात आहे असं अल्ताफ यांनी म्हटलं आहे.
"भारताच्या फाळणीपासून पाकिस्तानी सैन्याने कधीही निर्वासितांना देशाचे कायदेशीर नागरिक म्हणून स्वीकारले नाही. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट या लोकांच्या हक्कांसाठी सतत प्रयत्न करत आहे परंतु आतापर्यंत २५,००० हून अधिक निर्वासितांचा सैन्याने केलेल्या कारवाईत मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक बेपत्ता झाले आहेत" असंही अल्ताफ यांनी सांगितलं.
अमेरिकेतील ह्युस्टनमधील पाकिस्तानी कॉन्सुल जनरल आफताब चौधरी यांनी कार्यक्रमादरम्यान एक व्हिडीओ सादर केला, ज्यामध्ये अल्ताफ आणि एमक्यूएम यांना भारताचे एजंट म्हणून दाखवण्यात आलं होतं. "असे आरोप करून निर्वासितांचा आवाज दाबला जातो. पाकिस्तानमध्ये निर्वासितांना असंच वाऱ्यावर सोडलं आहे. पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर या निर्वासितांसाठी आवाज उठवावा आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी या समुदायाच्या लोकांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण करावं" असं अल्ताफ हुसेन यांनी म्हटलं आहे.