RAF Jawan Crime: उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानाने त्याच्या संपूर्ण कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत ४५ वर्षीय आरएएफ सैनिक केशपाल सिंह यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी प्रियांका देवी यांची प्रकृती चिंताजनक आहे. केशपाल सिंह यांच्या मुलीचीही प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर मुलीने पोलिसांना सांगितले की, आरएएफमध्ये तैनात असलेल्या एका महिला अधिकाऱ्याकडून माझ्या वडिलांचा सतत छळ केला जात होता. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललं. १३ वर्षीय मुलीने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांकडून आता या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आलाय.
मेरठच्या कंकरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती विहार परिसरात हा सगळा प्रकार घडला. पोलिसांना या घटनेची माहिती आनंद रुग्णालयातून मिळाली होती. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन चौकशी सुरु केली. त्यावेळी आरएएफच्या १०८ व्या बटालियनमध्ये असलेल्या केशपाल सिंह यांनी कुटुंबासह आत्महत्येता प्रयत्न केल्याचे पोलिसांना समजले. चौकशीत केशपाल हे बराच वेळ तणावात होते अशी माहिती समोर आली. याच तणावातून केशपाल यांनी पत्नी आणि मुलीसह विष प्यायलं.
पत्नीची प्रकृती गंभीर, मुलगी वाचली
तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी केशपाल यांना मृत घोषित केले. तर पत्नी प्रियांकावर उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आज तकच्या वृत्तानुसार, केशपाल सिंह यांच्या मुलीने एका महिला अधिकाऱ्याच्या छेडछाडीमुळे संपूर्ण कुटुंब तणावात होतं. त्यामुळेच वडिलांनी हे पाऊल उचलल्याचे मुलीने म्हटलं.
मुलीचे गंभीर आरोप
"माझ्या वडिलांची वरिष्ठ अधिकारी एक महिला होती. तिने वडिलांचा गैरवापर करून त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले. ती सतत अत्याचार करत होती. तुझ्या मुलीला ३६ तास तुरुंगात टाकेन आणि तुलाही तुरुंगात टाकेन, अशी धमकी ती वारंवार वडिलांना देत होती. मी तुझ्या घरावर छापा टाकीन. सर्व काही लुटून टाकेन, तुम्ही गरीब व्हाल, असं ती माझ्या वडिलांना सांगायची," असा आरोप केशपाल यांच्या मुलीने केला.
दरम्यान, या घटनेनंतर मेरठ पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यात येत असून जे काही तथ्य समोर येईल त्याआधारे पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.