सर्व धरणांतील पाणी पिण्यासाठीच राखीव

By Admin | Updated: August 23, 2015 20:40 IST2015-08-23T20:40:16+5:302015-08-23T20:40:16+5:30

हाताशी आलेल्या खरीपाच्या पिकांसाठी मात्र शेवटचे आवर्तन देणार

All the water conservancy reservoirs are reserved for drinking | सर्व धरणांतील पाणी पिण्यासाठीच राखीव

सर्व धरणांतील पाणी पिण्यासाठीच राखीव

ताशी आलेल्या खरीपाच्या पिकांसाठी मात्र शेवटचे आवर्तन देणार
पुणे: पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणी साठ्यात मोठी तुट आहे. त्यामुळे परस्थितीचे गार्भिय लक्षात घेऊन उपलब्ध असलेला पाणी साठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच प्राधान्य देऊन राखीव ठेवण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे स्पष्ट केले. दरम्यान हाताशी आलेले खरीपाचे पिक वाया जाऊ नये यासाठी शेवटचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.
पावसाने प्रचंड ओढ दिल्याने जिल्ह्यात धरणांतील पाणी साठ्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या धरणांमध्ये आलेल्या पाणी साठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी बापट यांनी संबंधित सर्व लोकप्रतिनिधीच्या उपस्थित तातडीने कालवा समितीची बैठक घेतली. बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,राज्यमंत्री दिलीप कांबळे, दोन्ही महापालिकांचे महापौर, आयुक्त, संबंधित सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. यावेळी जलसंपदा विभागाने दिलेल्या माहिती नुसार मुठा खो-यात ४१ टक्के, नीरा खो-यात १३ टक्के, पवना प्रकल्पात ३ टक्के आणि कुकडी खो-यात तब्बल ५६ टक्के पाणी साठ्यात तुट असल्याचे निदर्शनासा आणून दिले. पवसाची हीच परस्थिती कायम राहिल्यास आगामी पावसाळ्या पर्यंत म्हणजे १५ जुलै २०१६ पर्यंत पिण्याच्या पाण्याची गजर लक्षात घेऊन सर्व पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याची आवश्यकता आहे. तसेच पिण्याचे पाणी देखील अत्यंत काटकसरीने वापर करुन पाणी वापरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध आणण्याची आवश्यकता असल्याचे बापट यांनी सांगितले.
यावेळी बापट यांनी सांगितले की, पावसाचे नैसर्गिक संकट लक्षात घेता पाणी वाटप करताना शहरी ग्रामीण वाद न करता शेतकरी, उद्योग, आणि पिण्यासाठी पाणी या सर्वांचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार सध्या हाताशी आलेले खरीपाच्या पिकासाठी शेवटचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. हे आवर्तन सुरु असताना कॅनोल लगतच्या विहीरी व साठवण तलाव भरून घेणे, मोठ्या प्रमाणात कॅनोल दुरुस्ती करणे, बेकायदा पाणी उपश्यावर कारवाई करण्याचे आदेश बापट यांनी दिले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने जलसंपदाच्या विभागाने भरारी पथकांची नियुक्ती करुन या कारवाई करण्याचे आदेश बापट यांनी दिले.
---
ऑगस्ट, सप्टेंबर मोठा पाऊस नाही, परतीच्या पावसावरच भिस्त
कोकणसह मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात सध्या सरासरीच्या ४० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यात हवामानाची स्थिती लक्षात घेता आगामी काळात म्हणजे ऑगस्ट आणि स्पटेंबर महिन्यात फार मोठ्या पावसांची अपेक्षा नाही. यामुळे आता केवळ परतीच्या पावसावरच भिस्त असल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या उपमहा संचालिका मेधा खोले यांनी कालवा समितीच्या बैठकीत सांगितले.
----
कृत्रीम पावसाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा
राज्यात विविध ठिकाणी कृत्रीम पाऊस पाडण्याचे प्रयोग सुरु असून, सध्या पुण्यात कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुण्यात कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे सांगितले.
---
परवानगी न घेता पाणी सोडल्यास कारवाई
धरणांतील पाणी साठ्याची स्थिती गंभीर असताना सध्या काही धरणांच्या कालव्यातून हजारो क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. गरज नसताना व कोणतीही परवानगी न घेता धरणांतून पाणी कसे सोडले जाते ही बाब अत्यंत गंभीर असून, संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी आमदारांनी केली. याबाबत चौकशी करुन गरज नसताना पाणी सोडले जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिका-यावर त्वरीत निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी येथे सांगितले.

Web Title: All the water conservancy reservoirs are reserved for drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.