नवी दिल्ली:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'मत चोरी' आणि बिहारमधील SIR वरुन केलेल्या आरोपांबाबत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी(दि. १७) महत्वाची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मत चोरीच्या आरोपांना पूर्णपणे फेटाळून लावले. तसेच, "निवडणूक आयोगासाठी सर्व राजकीय पक्ष समान आहेत. आयोग कोणाशीही भेदभाव करत नाही. आमचे दरवाजे चर्चेसाठी नेहमीच सर्वांसाठी खुले असतात," असे स्पष्ट केले.
सर्व पक्ष आमच्यासाठी समानज्ञानेश कुमार पुढे म्हणतात, "तुम्हाला सर्वांना माहिती आहे की, कायद्यानुसार प्रत्येक राजकीय पक्षाचा जन्म निवडणूक आयोगात नोंदणीद्वारे होतो. मग निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेदभाव कसा करू शकतो? निवडणूक आयोगासाठी सर्व पक्ष समान आहेत. कोणीही कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तरी, निवडणूक आयोग आपल्या संवैधानिक कर्तव्यापासून मागे हटणार नाही. 'मत चोरी'सारख्या शब्दांचा वापर पूर्णपणे चुकीचा आहे. असे चुकीचे शब्द वापरुन जनतेची दिशाभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला, तर हा भारतीय संविधानाचा अपमान नाही तर दुसरे काय आहे? अशा प्रकरणांमध्ये न्यायालयात याचिका दाखल करायला हवी होती."
हा संविधानाचा अपमान"काही पक्ष आणि त्यांचे नेते बिहारमध्ये एसआयआरबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. बिहार एसआयआरमधील अनियमिततेसाठी अजूनही १५ दिवस शिल्लक आहेत. जमिनीवरील वास्तवाकडे दुर्लक्ष करून गोंधळ पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या दोन दशकांपासून सर्व राजकीय पक्ष मतदार यादीत दुरुस्तीची मागणी करत आहेत. ही मागणी पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने बिहारमधून एसआयआर सुरू केला आहे. निवडणूक आयोगाचे दरवाजे सर्वांसाठी सारखेच खुले आहेत," असेही ज्ञानेश कुमार यावेली म्हणाले.
मतदारांचे फोटो परवानगीशिवाय माध्यमांसमोर...ज्ञानेश कुमार पुढे म्हणाले, "आम्ही काही दिवसांपूर्वी पाहिले की, अनेक मतदारांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय माध्यमांसमोर सादर केले गेले. त्यांच्यावर आरोप करण्यात आले, त्यांचा वापर करण्यात आला. मतदारांचे फोटो, नावे आणि ओळख सार्वजनिकरित्या दाखवण्यात आली होती, जे पूर्णपणे चुकीचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत एक कोटीहून अधिक कर्मचारी, १० लाखांहून अधिक बूथ लेव्हल एजंट, उमेदवारांचे २० लाखांहून अधिक मतदान एजंट काम करतात. इतक्या लोकांसमोर इतक्या पारदर्शक प्रक्रियेत, कोणीही मत चोरू शकतो का?" असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.
दुहेरी मतदानाचा आरोप फेटाळला“काही मतदारांनी दुहेरी मतदानाचा आरोप केला. जेव्हा पुरावे मागितले, तेव्हा कोणतेही उत्तर दिले नाही. अशा खोट्या आरोपांना निवडणूक आयोग किंवा कोणताही मतदार घाबरत नाही. निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतातील मतदारांना लक्ष्य करून राजकारण केले जात असताना, आज निवडणूक आयोग सर्वांना हे स्पष्ट करू इच्छितो की निवडणूक आयोग निर्भयपणे गरीब, श्रीमंत, वृद्ध, महिला, तरुणांसह सर्व वर्ग आणि सर्व धर्मांच्या मतदारांसोबत कोणताही भेदभाव न करता उभा आहे आणि उभा राहील,” असेही त्यांनी यावेली स्पष्ट केले.