काश्मिरमध्ये भाजपासाठी सर्व पर्याय खुले - अमित शाह

By Admin | Updated: December 23, 2014 15:46 IST2014-12-23T15:46:38+5:302014-12-23T15:46:38+5:30

आम्ही सत्तेत सामील होऊ शकतो किंवा कुणालातरी पाठिंबा देऊ शकतो असे सांगत काश्मिरमध्ये भाजपासाठी सगळे पर्याय खुले असल्याचे पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले.

All options for BJP open in Kashmir - Amit Shah | काश्मिरमध्ये भाजपासाठी सर्व पर्याय खुले - अमित शाह

काश्मिरमध्ये भाजपासाठी सर्व पर्याय खुले - अमित शाह

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २३ - आम्ही सत्तेत सामील होऊ शकतो किंवा कुणालातरी पाठिंबा देऊ शकतो असे सांगत काश्मिरमध्ये भाजपासाठी सगळे पर्याय खुले असल्याचे पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले. झारखंडमध्ये ४० ते ४१ जागी विजय दृष्टीपथात असून भाजपाचे सरकार येईल हे स्पष्ट झाले आहे. तर जम्मू व काश्मिरमध्ये भाजपाला २५ जागा मिळण्याची व पीडीपीला ३० जागा मिळण्याची शक्यता आहे. नॅशनल काँग्रेसला १६ व काँग्रेसला ११ जागा मिळण्याची शक्यता असून सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षांना विरोधी बाकांवर बसायला लागण्याची चिन्हे आहेत.

पीडीपीच्या एका नेत्याने मुफ्ती मोहम्मद सईद यांनी नरेंद्र मोदींशी बोलावे आणि सत्ता स्थापन करावी असे सूचक उद्गार काढले असल्यामुळे तसेच अमित शाह यांनीही सगळे पर्याय खुले असल्याचे विधान केल्यामुळे भाजपा व पीडीपी सत्ता स्थापन करेल अशी चर्चा आहे. तसे झाले तर मुख्यमंत्रीपद नाही, परंतु उपमुख्यमंत्री भाजपाचा असेल का हा प्रश्नही उपस्थित होणार आहे.

भाजपाच्या संसदीय कार्यकारिणीची उद्या बैठक असून त्यात अंतिम निर्णय घेण्यात येईल असे समजते. झारखंडमध्ये जनता परीवार व काँग्रेस एकत्र आले परंतु त्यांना आठ जागा जेमतेम मिळाल्याचे दिसत आहे. तसेच काश्मिरमध्येही काँग्रेसला फारशा जागा मिळालेल्या नाहीत, हे बघता भाजपाची वाटचाल आधी ठरवल्याप्रमाणे काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेनेच होत असल्याचे अमित शाह म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपा व मोदींच्या नेतत्वावार जनतेने विश्वास ठेवल्याचे दिसून येत असल्याचेही शाह म्हणाले.

सध्याच्या स्थितीवर एक नजर

जम्मू व काश्मिर (८७ जागा)

भाजपा - २५

पीडीपी - ३०

नॅशनल काँग्रेस - १५

काँग्रेस - ११

अन्य - ६

 

झारखंड (८१ जागा)

भाजपा - ४०

झारखंड मुक्ती मोर्चा - १९

काँग्रेस - ७

झारखंड विकास मोर्चा - ७

अन्य - ८

Web Title: All options for BJP open in Kashmir - Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.