भारतात राहणारे सर्व हिंदूच -भागवत

By Admin | Updated: August 12, 2014 02:12 IST2014-08-12T02:12:05+5:302014-08-12T02:12:05+5:30

ओडिशातील कटक येथे रविवारी एका कार्यक्रमात भागवत म्हणाले की, इंग्लंडमध्ये राहणाऱ्यांना इंग्रज, जर्मनीत राहणाऱ्यांना जर्मन, अमेरिकेच्या लोकांना अमेरिकन म्हटले जात असेल तर,

All Hindus who live in India | भारतात राहणारे सर्व हिंदूच -भागवत

भारतात राहणारे सर्व हिंदूच -भागवत

नवी दिल्ली : हिंदुस्तानात राहणाऱ्या सर्वांना हिंदू म्हटले जावे, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले असून, त्यावर विविध पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू, माकप, बसपा आदी पक्षांनी भागवत यांच्यावर टीकास्त्र सोडले असताना, भाजपा आणि शिवसेनेने भागवत यांच्या विधानाचे समर्थन केले.
ओडिशातील कटक येथे रविवारी एका कार्यक्रमात भागवत म्हणाले की, इंग्लंडमध्ये राहणाऱ्यांना इंग्रज, जर्मनीत राहणाऱ्यांना जर्मन, अमेरिकेच्या लोकांना अमेरिकन म्हटले जात असेल तर, हिंदुस्तानातील लोकांना हिंदू का म्हटले जात नाही.
दरम्यान, त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया नोंदवत विविध पक्षांनी वादात उडी घेतली आहे. भागवत यांना मी राज्यघटना वाचण्याचा सल्ला देतो. घटनेत इंडिया म्हणजे भारत असाच उल्लेख आहे. हिंदुस्तान असे कुठेही म्हटलेले नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी स्पष्ट केले. भागवत यांचा घटनेवर विश्वास आहे काय? ते स्पष्ट करावे, असा सवाल माकपचे सीताराम येचुरी यांनी केला. देशाने स्वातंत्र्यापासून घटनेवर विश्वास ठेवला आहे. भविष्यातही हा विश्वास कायम राहील, असे जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी म्हटले. भागवत यांना भारतीय घटनेचे ज्ञान नाही. त्यांना ज्ञान असते तर त्यांनी असे म्हटले नसते, असा सल्ला बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी दिला. भागवत यांना हिंदू म्हणजे हिंदुस्तानी असे म्हणायचे होते. धार्मिक आधारावर हस्तक्षेप करण्याबाबत ते कधीही बोलले नाहीत, असे सांगत भाजपाचे नेते विनय कटियार यांनी भागवत यांचे समर्थन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: All Hindus who live in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.