भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 11:11 IST2025-11-09T10:52:41+5:302025-11-09T11:11:49+5:30
“संघाला कधीही सत्तेची इच्छा नाही. हिंदू समाज संघटित करून भारतमातेचा गौरव वाढवण्याचा प्रयत्न संघ करतो."

भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू सभ्यतेशी जोडली गेली आहे आणि तिचे पूर्वज हिंदूच आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते शनिवारी आरएसएसच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
भागवत म्हणाले, “संघाला कधीही सत्तेची इच्छा नाही. हिंदू समाज संघटित करून भारतमातेचा गौरव वाढवण्याचा प्रयत्न संघ करतो. जेव्हा संघ म्हणून एकत्रितपणे जोर लावला जातो, तेव्हा त्याचा उद्देश काही राजकीय फायदा घेणे नसतो तर भारत मातेच्या सेवेसाठी समाजाला एकतेच्या सूत्रात बांधने असतो. कधीकाळी लोकांना संघाच्या हेतूवर शंका होती, मात्र आता तेही संघाचे कार्य आणि उद्दिष्ट समजू लागले आहेत." या यावेळी संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे आणि इतर वरिष्ठ पदाधिकारीही उपस्थित होते.
भागवत पुढे म्हणाले, “इंग्रजांनी आपले राष्ट्र बनवले नाही. भारत प्राचीन काळापासूनच एक राष्ट्र आहे. प्रत्येक देशाची आपली संस्कृती असते आणि भारताची संस्कृती 'हिंदू' आहे. आपण स्वतःला काहीही म्हटले तरी आपली ओळख हिंदूच आहे. मुस्लीम आणि ख्रिश्चन असले तरी आपण सर्वजण एकाच सभ्यतेतून निर्माण झालो आहोत आणि आपले पूर्वज एकच आहेत.
भागवत म्हणाले, “भारतामध्ये कुणीही अहिंदू नाही. आपण हिंदू आहोत, हे सर्वांना माहीत असायला हवे, कारण, याचा अर्थच भारतासाठी जबाबदार नागरिक असा आहे." या शिवाय, "भारत हिंदू राष्ट्र आहे आणि संविधानही याला विरोध करत नाही. सनातन धर्म आणि भारत यांना वेगळे केले जाऊ शकत नाही. सनातन धर्माची प्रगती म्हणजेच भारताची प्रगती,” असेही भागवत म्हणाले.