देशातील सर्व विमानतळ ‘हाय अलर्ट’वर; एव्हिएशन सिक्युरिटी ब्यूरोने जारी केला अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:38 IST2025-08-07T11:37:50+5:302025-08-07T11:38:33+5:30
२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीसाठी प्रामुख्याने हा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ४ ऑगस्ट रोजी हा हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, देशातील सर्व विमानतळांवरील सुरक्षाव्यवस्थेमध्ये अधिक वाढ करत सतर्कता वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे.

देशातील सर्व विमानतळ ‘हाय अलर्ट’वर; एव्हिएशन सिक्युरिटी ब्यूरोने जारी केला अलर्ट
मुंबई : दहशतवादी कारवाया किंवा समाजकंटकांकडून काही घातपाती कारवाया होण्याची शक्यता असल्याचा अहवाल देत देशातील विमान सेवेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी या संस्थेने देशातील सर्व विमानतळांना हाय अलर्ट जारी केला आहे.
२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीसाठी प्रामुख्याने हा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ४ ऑगस्ट रोजी हा हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, देशातील सर्व विमानतळांवरील सुरक्षाव्यवस्थेमध्ये अधिक वाढ करत सतर्कता वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे. विमानतळ, धावपट्ट्या, हॅलीपॅड्स, विमान प्रशिक्षण संस्था अशा सर्वच ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सूचना काय केल्या?
विमानतळ आणि परिसरातील सीसीटीव्हीवरदेखील लक्ष ठेवण्यात यावे. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या परिसरातील पोलिसांशी नियमित संपर्क ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानातील प्रवाशांचे सामान तसेच मालवाहतूक करणाऱ्या विमानांतील सामानांची तपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. कर्मचारी, कंत्राटदारांची नियमित व काटेकोर पडताळणी करण्याचे आदेश आहेत.