घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरू असताना एक महिला तिचा होणाऱ्या जावयासोबत पळून गेल्याच्या प्रकरणाची गतवर्षी खूप चर्चा झाली होती. कुटुंब, समाज कशाचीही पर्वा न करता मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत प्रेमाचे चाळे करत अलिगडमधील या महिलेने त्याच्यासोबतच नवा संसार थाटला होता. मात्र दहा महिने त्याच्यासोबत नांदल्यानंतर या महिलेच्या प्रेम कहाणीत आता वेगळाच ट्विस्ट आला असून, सदर महिला आता तिच्या भाओजीसोबत पसार झाली आहे. एवढंच नाही तर जाता जाता तिने घरातील दोन लाख रुपयांची रोख रक्कम आणि दागिनेही लंपास केले आहेत. दरम्यान, आपल्यासोबत जवळपास दहा महिने राहिल्यानंतर ही महिला अचानक पळून गेल्याने त्रस्त झालेला तिचा प्रियकर असलेल्या राहुल याने तक्रार देण्यासाठी अलिगडमधील पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र हे प्रकरण बिहारमधील असल्याचं सांगत पोलिसांनी त्याला माघारी धाडले. त्यामुळे आता हे अजब प्रेम प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात ही गतवर्षी एप्रिल महिन्यात झाली होती. १६ एप्रिल रोजी सदर महिलेच्या मुलीचा विवाह होणार होता. घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र लग्नाला १२ दिवस उरले असतानाच ही महिला तिचा होणारा जावई असलेल्या राहुल याच्यासोबत पसार झाली होती. मुलीचं लग्न ठरल्यानंतर होणाऱ्या जावयासोबत सुरू झालेल्या बोलचालीतून सदर महिला त्याच्या प्रेमात पडून त्याच्यासोबत राहण्यासाठी घरातून पळून गेल्याची माहिती नंतर समोर आली होती. दरम्यान, ही महिला घरातून जाताना लाखो रुपयांची रोख रक्कम आणि दागदागिने घेऊन गेली होती. या घटनेमुळे या महिलेचा पती आणि मुलीला जबर धक्का बसला होता.
मुलीचा पाहण्याचा कार्यक्रम झाला तेव्हापासून सासूच्या मनात होणाऱ्या जावयाबाबत प्रेमाची भावना निर्माण झाली होती. जावयाला मोबाईल घेऊन देत सासूने पुढचे पाऊल टाकले होते. तासनतास हे दोघे फोनवर बोलत रहायचे. दरम्यान, हे दोघेही एके दिवशी संधी साधून अलिगडमधून पळून गेले होते. तसेच फिरून फिरून अखेरीस बिहारमधील मुझफ्फरपूर येथे पोहोचले होते. काही काळानंतर ते उत्तर प्रदेशमधील पोलिसांसमोर हजर झाले होते. तसेच इथे या महिलेने पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर होणारा जावई राहुल आणि सदर महिला पती-पत्नीप्रमाणे राहू लागले होते.
सुमारे दहा महिने बिहारमध्ये पती पत्नी सारखे राहिल्यानंतर सदर महिला तिच्या भाओजीसोबत पळून गेली, असा आरोप आता राहुल याने केला आहे. एवढंच नाही तर तिने २ लाख रुपयांची रोख रक्कम आणि लाखो रुपयांचे दागिनेही पळवून नेले, असा दावा त्याने केला. मी तिच्यासाठी घर सोडलं, समाजाचे टक्केटोमणे सहन केले. मात्र आता तीच मला सोडून गेली, अशा शब्दात राहुल याने आपली व्यथा मांडली आहे. दरम्यान, राहुल याने या संदर्भात अलिगडमधील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. मात्र हे प्रकरण आपल्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे पोलिसांनी सांगिलते. त्यामुळे आता राहुल हा बिहारमधील मुझफ्फरपूर येते तक्रार दाखल करणार आहे.